गोंदिया,दि.03 – ‘एक दिन सायकलके नाम’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील ‘जेसिआय राईस सिटी व आज फोरम’ या ग्रुपच्या माध्यमातून दर रविवारी एक तास २० ते २५ किलोमीटर सायकल चालवली जाते. यात पेट्रोल व डिझेलची बचत करा व पर्यावरण वाचावा असा संदेश दिला जातो. या उपक्रमाला रविवारी (३ ऑक्टोबर) १२५ आठवडे पूर्ण झाले. याच ग्रुपमधील दोन सदस्य अशोक मेश्राम व भारतचंद्र बघेलेने गोंदिया ते वाघा बॉर्डर व जम्मू-काश्मीर असा सायकलने प्रवास आज रविवारला सुरू केला आहे.यावेळी गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,नगराध्यक्ष अशोक इंगळे,मंजु कटरेसह अनेक मान्यवरांनी सकाळी उपस्थित राहून त्या युवकांना हिरवी झेंडी दाखवित रवाना केले. प्रत्येक रविवारी १ तास तरी सायकल चालवावी व भविष्यात पेट्रोल व डिझेलची बचत व्हावी तसेच पर्यावरण वाचवावे, अशी संकल्पना आहे. आपण नेहमी मोटारसायकल चालवत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, सायकल चालवत असल्याने इंधनाची बचत होत असल्याचा संदेश यात दिला जातो. आज या उपक्रमाला १२५ आठवडे पूर्ण होत असुन रविवारी गोंदियातील दोन युवकांनी गोंदिया ते वाघा बॉर्डर व जम्मू-काश्मीर असा ५ हजार किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे. ३५ दिवसांमध्ये पार करणार आहेत. दरदिवशी १५० किलोमीटर सायकल चालवून हा प्रवास पार करणार आहे.या युवकांसाठी मदतनिधी गोळा करुन त्यांना वाटेतील खर्चासाठी रक्कम देण्यात आली आहे.





