गोंदियातील मायलेकींनी भूकंपाचे ६० हादरे अनुभवले

0
8

गोंदिया : यात्रा करायला गेलेल्या गोंदियातील मायलेकींनी नेपाळ येथील भूकंपाचे ६० हादरे अनुभवले. नशिब बलवत्तर म्हणऊनच त्यांचा जीव वाचला. जीव मुठीत घेऊन बसलेल्या या मायलेकींसह त्यांच्यासोबतचे यात्रेकरून सुदैवाने भारतात सुखरूप परतले. मात्र तब्बल सात तास गोंदियातील गुप्ता परिवाराच जीव टांगणीला लागला होता.

गोंदियातील शशिकांत गिरधरभाई कोटक (७४) यांच्या तीन विवाहित मुली आपापल्या कुटुंबीयांसह नेपाळच्या काठमांडू येथे फिरायला गेल्या होत्या. गोंदियातील यामिनी विशाल गुप्ता (३८) व खुशी विशाल गुप्ता (७) हे सहा जण २२ एप्रिल रोजी नागपूरवरून गोरखपूरमार्गे काठमांडूसाठी रवाना झाले. २५ रोजी सकाळी दर्शनासाठी गेले असताना त्याचवेळी भूकंपाचे हादरे बसले. त्यावेळी ते स्वत:चा बचाव करीत पहाडीवरून बसच्या सहाय्याने खाली उतरले. त्यांनी ती रात्र मैदानात घालविली. रविवारी ते सकाळी ११ वाजतादरम्यान बसने पोखरा येथून निघाले. सकाळी ते गोरखपूरला आले. आता नागपूरला येण्यासाठी प्रवासातच आहेत.नेपाळमध्ये भूकंप आल्याची वार्ता कानी पडताच त्यांच्या नातेवाईकांनी टीव्हीवरील बातम्या सुरू करून नेपाळ येथे गेलेल्या नातेवाईकांना फोन वरून सतत संपर्क केला. कुणी देवाला साकडे घालायचे तर कुणी नवस फेडण्याची तयारी दर्शवायची. नातेवाईक एकमेकांना फोन लावून तुमचा संपर्क त्यांच्याशी झाला का हेच विचारणा करीत होते. तब्बल सात तासानंतर सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्यांच्याशी संपर्क झाला,‘आम्ही सुरक्षित आहोत’ ही वार्ता कानी पडताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. परंतु सुखरूप भारतात परतत नाही तेव्हापर्यंत त्यांच्या मनात भितीच होती. सकाळी कानपूर येथे पोहोचले असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला.