राहुल गांधी २९ रोजी विदर्भात

0
13

नागपूर : भूमी अधिग्रहण विधेयक कसे शेतकरी विरोधी आहे व मोदी सरकार हे ‘कॉर्पोरेट’धार्जिणे कसे आहे, हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राहुल गांधी मैदानात उतरत आहेत. यासाठी ‘किसान पदयात्रा’ काढणार असून, याची सुरुवात ते विदर्भातून करणार आहेत. या पदयात्रेसाठी राहुल गांधी यांचे २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिल्ली येथून नागपुरात विमानाने आगमन होणार आहे. रात्री नागपुरात मुक्काम करून ३० रोजी ते अमरावती येथे रवाना होणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांचे २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिल्ली येथून नागपुरात विमानाने आगमन होईल. विमानतळावरून कडेकोट सुरक्षेत त्यांचा ताफा रविभवनला पोहोचेल. रविभवन येथे त्यांचा रात्री मुक्काम असेल. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ते अमरावतीसाठी रवाना होतील. ते हेलिकॉप्टरने जातील की रस्तामार्गे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे अमरावती येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अद्याप याबाबत कुठल्याही सूचना मिळालेल्या नाहीत. नागपूर शहर पदाधिकाऱ्यांना मात्र प्रदेश काँग्रेसकडून राहुल गांधी २९ ला रात्री नागपुरात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. मात्र, ते ३० एप्रिल रोजी कुठे जातील, याबाबत काहीच कळविण्यात आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे २९ एप्रिल रोजी दुपारीच नागपुरात दाखल होत आहेत.

राहुल गांधी यांच्या विदर्भ दौऱ्याचा निश्चित कार्यक्रम अद्याप प्रदेश काँग्रेसकडे आलेला नाही. मंगळवारी दुपारपर्यंत दौऱ्याचा कार्यक्रम येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच दौऱ्याची तारीख, वेळ व ते कुठे कुठे जाणार आहेत, हे स्पष्ट होईल.

– खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस