आंतरजातीय दाम्पत्याच्या अपत्याची जात ‘भारतीय’

0
18

मुंबई- दि. ११ – भारतातील जातीव्यवस्था तोडून टाकणे हेच आंबेडकरी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे, त्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याच्या मुला-मुलीची जात भारतीय अशी लावावी, तसा शासकीय आदेश काढावा, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारला केले. शाळेच्या दाखल्यावरूनही जात हद्दपार करा, या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला. यापुढे आंबेडकरी चळवळीचा जातीच्या पलीकडे जाऊन माणसाच्या विकासाचा अजेंडा असेल, असे त्यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांच्या एकसष्टीनिमित्त महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांच्या पत्नी अंजली, आई मीराताई, बहीण रमाताई तेलतुंबडे, बंधू भीमराव व कुटुंबातील अनेक सदस्य आणि आंबेडकरी चळवळीतील, डाव्या पुरोगामी संघटनांमधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भारिपचे नेते ज. वि. पवार, प्रा. अविनाश डोळस, आमदार बळीराम शिरस्कर, माजी आमदार हरीदास भदे, कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. भालचंद्र कांगो, प्रकाश रेड्डी, विजय कुलकर्णी, मिलिंद रानडे, शेकापचे प्रा. एस. व्ही. जाधव आदी नेत्यांची या वेळी भाषणे झाली.
आंबेडकर म्हणाले की, आजची परिस्थिती भयानक आहे, लोकांना पर्याय हवा आहे, आंबेडकरी चळवळीने तो पर्याय दिला पाहिजे, असे ते म्हणाले. मात्र हा पर्याय देताना कुणा-कुणाशी भांडणार, देवाशी भांडणार की माणसांच्या प्रश्नांसाठी लढणार, याचे भानही आंबेडकरी चळवळीने ठेवले पाहिजे.
दलित नेतृत्व किंवा चळवळ संपवण्यासाठी प्रस्थापितांकडून सत्तेची अमिषे दाखविली जातात. त्याला काही लोक बळी पडतात. परंतु बोफोर्स प्रकरणानंतर अडचणीत आलेल्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मला केंद्रात मंत्री करण्यासाठी निरोप पाठविला होता, मात्र त्याला मी नकार देऊन चळवळ संपवण्याचा प्रस्थापितांचा डाव उधळून लावला, याची आठवण त्यांनी सांगितली. दलितपण हे एकेकाळी चळवळीचे भांडवल होते, त्याला आता वेगळे स्वरूप देण्याची गरज आहे, त्याची परिभाषा बदलण्याची आवश्यकता आहे. जातीव्यवस्था मोडूनच राष्ट्र उभारणी करावी लागेल. त्यासाठी शाळेच्या दाखल्यावरून जात काढावी आणि आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाची जात भारतीय लावावी, शासनाने तसा निर्णय करावा, अशी मागणी त्यांनी केली.