बँक कर्मचा-यांचा बुधवारी देशव्यापी संप

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली – वेतनावाढीसंदर्भातील मागणीवर कोणताही तोडगा न निघाल्याने बँकातील कर्मचा-यांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) आणि इंडियन बँक्स असोसिएशन्स (आयबीए) यांच्यात सोमवारी वेतनवाढीसंदर्भात चर्चेची १४ वी फेरी पार पडली. मात्र या चर्चेत काहीही निष्पन्न न झाल्याने १० लाख बँक कर्मचा-यांनी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी १२ नोव्हेंबरला हे सर्व कर्मचारी देशव्यापी संप करणार आहेत. यामुळे चेक वठवणे तसेच एटीएम सेवांवर या संपाचा परिणाम होऊ शकतो. वेतनवाढीसाठी गेले वर्षभर बँक संघटना आंदोलन करत आहेत. बँक संघटनाकडून २३ टक्के वेतनवाढीची मागणी केली जात आहे. मात्र आयबीएङ्कने ११ टक्के वाढीचाच प्रस्ताव कायम ठेवल्याने बँक संघटनांनी संप करण्याचे ठरवले आहे.
आम्ही वेतनवाढीची मागणी २५ टक्क्यांवरुन २३ टक्क्यांवर आणली. मात्र त्यानंतरही आयबीए ही मागणी मान्य करत नाही. आयबीए त्यांच्या ११ टक्के वाढीच्या प्रस्तावावर कायम आहे जे पुरेसे नाही असे नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्सचे सरचिटणीस अश्विनी राणा यांनी सांगितले.
१२ नोव्हेंबरला होणा-या देशव्यापी संपासंदर्भातील नोटीस यूएफबीयूने आयबीएला दिली असून ऑल इंडिया स्टेट बँक ऑफिसर फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टेट बँक स्टाफ फेडरेशनही या संपात सहभागी होणार असल्याचे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे. देशभरात सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँका असून यात आठ लाख कर्मचारी काम करीत आहेत. संपूर्ण देशभरात या बँकांच्या ५० हजार शाखा आहेत.