स्वातंत्र्योत्तर काळातील जलयुक्त शिवार पहिली लोकचळवळ – मुख्यमंत्री

0
13

नागपूर दि. ८: जलयुक्त शिवार या अभियानाला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून स्वातंत्र्योत्तर काळातील पाण्यासाठीची ही पहिली लोकचळवळ असावी, असे मत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी नागपूर जिल्ह्यातील उखळी (मोंढा), उखळी, जुनेवाणी, किन्ही धानोली, बाजारगाव, पांजराकाटे, घुरखेडा यागावांना भेटी देऊन जलयुक्त शिवार अंतर्गत सुरु असलेल्या नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट नालाबांध, आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत लोकसहभागातून सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, आमदार आशिष देशमुख, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे होते.
जुनेवाणी येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात 6 हजार गावांमध्ये 27 विविध प्रकारची कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु आहे. अजूनही 82 टक्के शेती ही कोरडवाहू आहे. शेती सिंचनाखाली आल्याशिवाय शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार नाही. जलयुक्त शिवार अभियान ही आता लोकचळवळ बनली असून लोकसहभागातून सुमारे 30 कोटी रुपयांची कामे झाली आहेत.
येत्या पावसाळ्यात या कामाचे दृष्यरुप पाहायला मिळेल आणि त्यानंतर स्वत:हून लोक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, येत्या पाच वर्षात राज्यातील 20 हजार गावे दुष्काळमुक्त होतील. जलक्रांतीशिवाय आता पर्याय नाही. सिमेंटनाला बांध, माती नालाबांध, शेततळे, नाला बंडींगमध्ये पावसाळ्यात पडणारे पाणी साठविल्यानंतर जमिनीतील पाण्याची पातळी आपोआप वाढेल.
उखळी (मोंढा) येथील नाला खोलीकरणाची पाहणी करताना श्री. फडणवीस म्हणाले, नाल्याच्या काठावर वृक्ष लागवड केल्यास काठावरील माती ढासळणार नाही, आणि पर्यावरणाचे संवर्धन होईल. कामाच्या दुरुस्तीसाठी अधिकचा निधी देण्या येईल.
मोंढा उखळी येथील एकूण नऊ कामे कृषी विभागातर्फे करण्यात आली असून पहिल्या नाल्याची लांबी 290 मीटर तर खोली 2.80 मीटर एवढी आहे. यात 7.82 टी. बी. एच. पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या नाल्याची 245 मीटर लांबी आहे. तिसऱ्या नाल्याची लांबी 225 मीटर असल्याची माहिती कृषी विभागाचे सहसंचालक डॉ. विजय घावटे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी यावेळी दिली.
जुनेवाणी येथील नाल्याची लांबी 245 मीटर एवढी आहे. जलयुक्त शिवार अभियांनातर्गत सुरु असलेल्या कामाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त करुन गती वाढविण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेद्वारे हिंगणा तालुक्यात जुनेवाणी, डेगमा, अंबाझरी, खामली येथे 5 पोकलॅंड उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आणि याद्वारे या गावात 22 किलोमीटर लांबीचे जुन्या बंधाऱ्यातील नाला खोलीकरणाचे 330000 घनमीटर काम करण्यात आले आहे. या कामाचे मूल्य 1 कोटी 32 लक्ष रुपयाचे आहे. याकामाकरिता डिझेलसाठी लागलेला 17 लाख रुपयांचा निधी महात्मा ज्योतिबा फुले जल भूमी संधारण अभियान मधून उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
सिद्धीविनायक ट्रस्टद्वारे प्राप्त झालेल्या 1 कोटी रुपये निधीपैकी उपविभाग काटोल आणि नागपूर (ग्रामीण) तालुकास्तरीय समितीस प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामाकरिता वितरीत करण्यात आला आहे.
विशेष निधी अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडे 52.60 कोटी रुपये प्राप्त झालेला आहे. त्यापैकी 67.41 कोटी रुपये विविध यंत्रणेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे व 39.09 कोटी रुपये विविध यंत्रणांना वितरीत केला आहे. उर्वरित निधी पैकी 13 कोटी रुपये उपविभागीय अधिकारी (महसूल) मार्फत 13 तालुक्यांना गाव आराखड्यानुसार सध्या अस्तित्वात असलेले पाणी साठवण्याचे बांधबंधारे दुरुस्तीचे व नाला खोलीकरणाचे व पाणलोट कामांकरिता सर्व यंत्रणेच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीकडून निधी वाटप करण्याची कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यातील 67.42 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी दिली.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेले काम अधिक जोमाने सुरु ठेवावे, असे निर्देश देऊन मुख्यमंत्री म्हणाले, पुन्हा 15 दिवसानंतर आपण स्वत: पाहणी करायला येणार आहोत. सिंचनाच्या बाबतीत देशासमोर एक आदर्श निर्माण करुन द्यावयाचा आहे. आणि पावसाळ्यात पडणारे पाणी साठविल्याशिवाय ते शक्य नाही. तेव्हा आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.