विदर्भ राज्य बनविण्याच्या आश्वासनाचा भाजपला विसर

0
6

गोरेगाव दि. ८: राममंदिर व काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले होते. आज भाजप या आश्वासनांना विसरली आहे. एवढेच नव्हे तर विदर्भ राज्याचे आश्वासन देत विदर्भात विजयी झालेला भाजप आज विदर्भ राज्याच्या आश्वासनापासून फिरला असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.गोरेगाव तालुक्यातील ग्राम शहारवानी, कुऱ्हाडी, मुंडीपार, घोटी व सोनी येथे तालुका कॉंगे्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते.

पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, भारतीय जनता पक्ष फक्त काँग्रेसने बनविलेल्या योजनांचे नामकरण करीत आहे. जनतेला काळा पैसा परत आणून १५ लाख रूपये देण्याचे स्वप्न दाखविणारी भाजप सरकार आता मरणानंतर दोन लाख रूपये देण्याची गोष्ट करीत आहे. अगोदर धानावरील बोनस बंद केला व आता बोनस सुरू करून व्यापाऱ्यांना त्याचा लाभ मिळवून दिला जात आहे. पेट्रोलच्या दराने काँगेसचा रिकॉर्ड तोडला असून ७३ रूपये प्रती लिटर सरकार सर्वसामान्य नागरिकाकडून वसूल करीत आहे. भाजपची ही दोगली निती काँगे्रस कार्यकर्त्यांनी जनतेपुढे मांडल्यास निश्चीतच कॉंग्रेसला उत्तम प्रतिसाद मिळणार असल्याचे मत त्यांनी मांडले.
सभेला कॉंग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के.आर. शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. झामसिंग बघेले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. योगेंद्र भगत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, डॉ. नामदेव किरसान, महासचिव पी.जी. कटरे, जगदीश येरोला, सी.टी. चौधरी,जितेंद्र कटरे,विशाल शेंडे,विवेक मेंढे,डेमेंद्र रहागडाले,ओमप्रकाश कटरे,सशेंद्र भगत व अन्य उपस्थित होते.