‘इतिहासा, तू वळूनी पहा, पाठीमागे जरा.
झुकवून माथा करू त्यांना, आपण मानाचा मुजरा’
‘माता’ या शब्दातच आपल्या ला मातृत्वाची जाणीव होत असते. माता ही केवळ मायाळू, डोळे झाकून आपल्या मुलांवर प्रेम करणारीच नसून वेळप्रसंगी शक्तीसुद्धा असते. याचं अगदी सर्वात मोठं उदाहरण जर द्यायचं झालं तर नाव आठवतो तो’ राजमाता जिजाऊ ‘यांचं. त्यांनी अगदी कठीण परिस्थिती वर मात करून स्वराज्याचे निर्माते शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य स्थापन ही कल्पनाच जिजाऊंनी अगदी बालपणापासून शिवरायांच्या मनावर कोरलेली होती. प्रचंड आत्मविश्वास त्यांनी बालपणामध्येच निर्माण केला होता.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्य़ातील महेकर तालुक्यातील शिंदखेड गावातील लखुजीराव जाधव व म्हाळसाराणी यांच्या घरी चार मुलानंतर कन्या रत्न जन्माला आले. तो शुभदिवस होता १२जानेवारी १५९८.ज्यांचं नाव होतं जिजाबाई. राजनिती, युद्धकला या शिक्षणात त्यांनी बालपणातच प्राविण्य मिळवलं होते व तेच त्यांना शिवरायांना तयार करण्यात कामी आले.
म्हणून च आज आपण एक ब्रीदवाक्य नेहमी बोलतो ऐकतो.
एक मुलगी शिकली तर पुर्ण घराला साक्षर करते.
किंवा
शिकलेली आई घरादाराला पुढे नेली.
अहमदनगरच्या निजामशाही पदरी एक सरदार म्हणून काम करणाऱ्या शहाजीराजांच्या पत्नी म्हणजे या जिजाबाई. ज्यांनी शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १६३०मध्ये शिवाजींना जन्म दिला. त्यांनी कुलदेवी तुळजाभवानी ला प्रार्थना केली होती की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे.
म्हणतात ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी
ते जिजाऊ सारख्या शुरवीर पुत्र मातेमुळेच. शिवाजी अवघे १४वर्षांचे असतांना जिजाऊ पुण्याला आल्या. तेव्हा पुण्यातील अवस्था अतिशय भीषण होती. त्यांनी दादाजी कोंडदेव यांच्यासोबत पुणे शहराचा पुनर्विकास केला. शिवरायांना प्रत्येक प्रसंगी खंबीर मार्गदर्शन केले. राष्ट्र आणि धर्म संस्कार करण्यासाठी रामायण, महाभारतातील गोष्टी त्या सांगत. त्याच शिवरायांच्या आद्यगुरू होत्या.
ज्या काळात अस्पृश्यांची सावली पडली तरी महापाप मानलं जात होते. त्या काळात प्रत्यक्ष ढोरवाड्यात जाण्याइतकं हे व्यक्तिमत्त्व साहसी होतं. आंबीलओढ्याचा प्रवाह बदलून निसर्गावर मात करण्याइतके त्या कल्पक आणि बुद्धीमान होत्या. बाटवलेल्या बाबाजी नाईक निंबाळकरांचे शुद्धीकरण केल्यावर त्याच्या मुलाला कुणीही मुलगी देत नाही म्हणून आपल्या नातीशी त्यांनी विवाह करून दिला. अशा विचाराने पुरोगामी व कृतीने खंबीर जिजाऊंनी शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण क्षणानंतर अवघ्या बारा दिवसात म्हणजे १७जून१६७४ मध्ये देह सोडला. अशा या जिजाऊमुळेच शिवराय व हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
जिजामाता एक आदर्श माता होत्या. आपल्या मुलांना परोपकार, धैर्य, आत्मविश्वास, शौर्य, राष्ट्रप्रेम व न्याय या सर्वांचे धडे देण्याचे सामर्थ्य प्रत्येक मातेमध्ये असते. गरज आहे ती आपली स्त्रीशक्ती ओळखण्याची व उज्ज्वल भविष्यनिर्मितीसाठी आपल्या मुलांना तयार करण्याची.
अशा या जिजाऊंच्या कार्याला आणि त्यांच्या त्यागाला मानाचा मुजरा. या राष्ट्रमातेवर ज्याठिकाणी संस्कार झाले ते ऐतिहासिक स्थळ म्हणजे शिंदखेड राजा. आज या स्थळाला पर्यटन स्थळाचे स्वरुप प्राप्त झाले असून आज ही दरवर्षी १७जून रोजी ‘जिजाऊ महोत्सव सोहळा’ जिजामातेच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जातो.
*तुम्ही नसता तर नसते झाले,
शिवराय नी शंभु छावा.
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा.
तुम्ही नसता तर नसते लढले,
जिद्दीने मावळे.
तुम्ही नसता तर नसते दिसले,
विजयाचे ते सोहळे*
आदर्श पत्नी, आई आणि प्रशासक राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली.





