मुंबई दि. ८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त नोकरी करणाऱ्या अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राज्यात तीन वसतीगृहे उभारण्याचा विचार असून त्यासाठी जागा शोधून आराखडा तयार करावा, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारी संबंधीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, विभागाचे उपसचिव दि. रा. डिंगळे, समाज कल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त एम. एस. आत्राम, सह आयुक्त पी. व्ही. पाटोळे, कक्ष अधिकारी चंद्रकांत वडे आदी उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 2015-16 हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आयोजित करावयाच्या विविध कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा आढावा घेऊन श्री. बडोले म्हणाले की, नोकरी करणाऱ्या अनुसूचित जातीच्या महिलांना मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त ही वसतीगृहे बांधण्यात येणार आहेत. तसेच या समता व सामाजिक न्याय वर्षात राज्यातील 50 तालुक्यात अनुसूचित जातीच्या मुलींसाठी 50 विद्यार्थीनी क्षमतेचे वसतीगृह बांधण्यात येणार असून त्यासाठीही आराखडा तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.