ताहिलरामाणी नवे मुख्य न्यायाधीश

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि. ८-मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहीम शांतीलाल शाह आज मंगळवारी सेवानिवृत्त झाले असून, वरिष्ठ न्यायाधीश श्रीमती विजय कमलेश ताहिलरामाणी यांची नवे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या उद्या बुधवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत.
विधी मंत्रालयाने याबाबतचे परिपत्रक मंगळवारी जारी केले. मोहीत शाह मुख्य न्यायाधीश पदावरून निवृत्त झाले असल्याने, त्यांच्या जागी न्या. ताहिलरामाणी या पदभार स्वीकारणार असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले.
न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची दोन दशक जुनी प्रथा मोडीत काढून राष्ट्रीय न्यायालयीन नियुक्ती आयोग कायद्यात आवश्यक त्या सुधारणा केल्यानंतर सरकारने अलीकडील काळात अन्य तीन उच्च न्यायालयांमध्येही अशाच प्रकारे नियुक्त्या केल्या आहेत.
न्या. मोहीम शाह हे गेल्या पाच वर्षांपासून मुख्य न्यायाधीश होते. २६ जून २०१० रोजी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाची सूत्रे स्वीकारली होती. तत्पूर्वी, २४ डिसेंबर २००९ रोजी त्यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांची वाईट अवस्था, आश्रय गृह आणि शिक्षणासोबतच विविध सामाजिक मुद्यांची स्वत:हून दखल घेत महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. आपल्या कारकिर्दीत मी केवळ लोकसेवेवरच भर दिला आहे. येथील लोकांना मी समजून घेतले आहे. नागरिकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव असल्याचे मला लक्षात आले आहे, असे त्यांनी निवृत्तीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.