मुंबईतील ७/११ बॉम्बस्फोट: १२ जण दोषी, १ निर्दोष

0
8

मुंबई, दि. ११ – मुंबईतील ११ जुलै २००६ किंवा ७/११ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई विशेष सत्र न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठरवले असून एका आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या या स्फोटांत १८८ नागरिकांनी आपला जीव गमावला होता तर तब्बल ८२९ जण जखमी झाले होते.

न्यायालयाने कमाल अहमद अन्सारी(३७), डॉ. तन्वीर अन्सारी (३७), मोहम्मद फैसल शेख (३६), सिद्दीकी (३०), मोहम्मद शफी (३२),शेख आलम शेख (४१), मोहम्मद अन्सारी (३४), मुझमिल शेख (२७), सोहिल शेख (४३), जमीर शेख (३६), नावेद खान (३०) व असिफ खान (३८) या १२ आरोपींना दोषी ठरवले असून अब्दुल शेख याची सर्व आरोपातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या १२ दोषींच्या शिक्षेवर सोमवारी युक्तिवाद होणार आहे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालय प्रत्येक गुन्हेगाराला किती शिक्षा द्यायची हे जाहीर करणार आहे. या खटल्यादरम्यान सरकारतर्फे १९२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, बचाव पक्षातर्फे ५१ साक्षीदार हजर करण्यात आले तर न्यायालयातर्फे एका साक्षीदाराची साक्षी नोंदवण्यात आली.

११ जुलै २००६ मध्ये पश्चिम रेल्वेच्या खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहिम, मीरारोड, माटुंगा व बोरीवली या स्थानकांवरील लोकलमध्ये ११ मिनीटात सात बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. या साखळी स्फोटांनी मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवले होते. या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने १३ जणांना अटक केली होती. नऊ वर्षानंतर या प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला आहे. कोर्टाने १२ आरोपींना दोषी ठरवले. हत्या, देशाविरोधात कट रचणे आदी कलमांखाली या आरोपींना दोषी ठरवण्यात आले.

न्यायालयाच्या निर्णयामुळे या स्फोटांमध्ये मृत्यूमुखी पडलेले तसेच जखमी झालेले नागरिक व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया तत्कालिन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख के.पी. रघुवंशी यांनी व्यक्त केली. दहशतवादविरोधी पथकाच्या तपासामध्ये आयएसआय व लष्कर-ए-तय्यबा यांनी या बाँबस्फोटांची आखणी केली होती.