गोंदिया,दि.११ : राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची सभा १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. सभेला निवासी उपजिल्हाधिकारी एन.के.लोणकर हे अध्यक्षस्थानी होते. सभेला महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष डॉ.प्रमोद रक्षमवार व डॉ.संदीप इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समीर भाटकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून असंख्य अधिकारी कार्यालयीन कामकाज तत्परतेने करीत असतांना काही अधिकाऱ्यांबाबत जनमानसात नकारात्मक भावना दिसून येत असल्याचे सांगितले. काही अधिकारी त्यांच्याकडे येणाऱ्या सामान्य नागरिकांना आस्थेवाईकपणे मार्गदर्शन करीत नाही. अधिकाऱ्यांनी प्रामाणिक जनसेवा करावी. असे आवाहनही श्री.भाटकर यांनी केले.
कार्यसंस्कृती अभियानानंतरचे पुढचे पाऊल विकासासाठी व भ्रष्टाचारमुक्त शासन-प्रशासनासाठी ‘पगारात भागवाङ्क हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगून श्री.भाटकर म्हणाले, काही अधिकारी लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याने अशा घटनांमुळेच सर्वच अधिकारी भ्रष्टाचारी असल्याची वाईट प्रतिमा जनमानसात तयार झाली आहे. ही प्रतिमा महासंघाच्या प्रतिमेस काळवंडणारी आहे. त्यामुळे महासंघाने ‘पगारात भागवाङ्क हे अभियान जाणिवपूर्वक राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पगारात भागवा याचा अर्थ हव्यास टाळा. कोणताही मोह न धरता आपले जीवन यशस्वी व अर्थपूर्ण करता येते. भ्रष्टाचार संपविण्यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने हे अभियान अंगिकारले आहे. असे त्यांनी सांगितले.
राज्यातील जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याची नितांत आवश्यकता असून त्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग असणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनातील जे घटक वाममार्गाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न करीत असतील तर संबंधित विभागाकडे निर्भीडपणे त्यांनी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहनही श्री.भाटकर यांनी केले.
सभेला कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, विभागीय वन अधिकारी श्री.कातुरे, सहायक वनसंरक्षक अश्विन ठक्कर, डॉ.श्रीरामे, डॉ.कोटांगले यांचेसह विविध विभागाचे राजपत्रित अधिकारी उपस्थित होते.