कर्तव्य श्रेष्ठ! भाजी विक्रेत्या आईवर मुलाने केली कारवाई

0
62
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अहमदनगर,दि.8: कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कथा आपण नेहमीच ऐकल्या असतील. कर्तव्य बजावताना रक्ताच्या नात्याचाही अडसर न येऊ देणारे अधिकारी तसे क्वचितच सापडतील. एखाद्या चित्रपटात शोभेल असे एक उदाहरण अहमदनगरमध्ये बघावयास मिळाले. हातावर पोट असणाऱ्या आपल्या भाजीविक्रेत्या आईवर एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने जप्तीची कार्यवाही करीत कर्तव्यापुढे कोणतेही नाते श्रेष्ठ नसल्याचा आदर्श समाजापुढे ठेवला. त्याच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात सध्या कडक टाळेबंदी आहे. त्यामुळे भाजीची दुकानेही बंद ठेवण्याचा आदेश आहे. एका जागी बसून भाजी विकण्यास बंदी आहे. तरीही पाथर्डी शहरात गर्दी होत असल्याचा तक्रारी आहेत. त्यामुळे झालेल्या बैठकीत कारवाई करण्याचा निर्णय झाला. नगरपरिषदेचे पथक वाहन घेऊन भाजी विक्रेते बसतात त्या ठिकाणी आले. पथकात रशीद शेख यांचाही समावेश होता. त्यांची आई बेगम रफीक शेख भाजी विक्रेत्या आहेत. त्याही याच रस्त्यावर भाजी विकत बसल्या होत्या. रशीद शेख यांनी कोणताही विचार न करता आपल्या आईच्या पुढ्यातील भाजीच्या टोपल्या उचलून घेऊन कचरा गाडीत टाकल्या. आपल्या कर्तव्य कठोर मुलाकडे पाहत राहण्यावाचून आईकडेही पर्याय नव्हता.

शेख यांनी आपल्या आईचीच भाजी जप्त केल्याची माहिती शहरात पसरली तेव्हा त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करण्यात आले. तहसीलदार आणि पालिका अधिकाऱ्यांनीही शेख यांनी कोणताही भेदभाव न करता केलेल्या कारवाईचे कौतुक केले. यावर प्रतिक्रिया देताना शेख म्हणले, ‘गर्दी होत असल्याने करोना पसरत आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी नियम पाळले पाहिजेत. नियम सर्वांसाठी आहेत. त्यामुळे करवाई करताना मी आईचा विचार केला नाही. इतरांप्रमाणेच कारवाई केली. सर्वांना माझे आवाहन आहे की, नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करत राहू.’ शेख यांनी केलेली कारवाई छोटी वाटत असली तरी हातावर पोट असलेली भाजी विक्रेती आई आणि पालिकेत साधा कर्मचारी असलेला तिचा मुलगा यांच्यासाठी ती तुलनेत मोठी आहे.