‘आत्मसमर्पण योजनेचे नक्षवाद्यांना आकर्षणङ्क

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

 आत्मसमर्पित नक्षल कमांडरची कबुली
 आत्मसमर्पण केलेल्या सहका-यांचे केले अभिनंदन

नागपूर, ,दि.१३ः – गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगार तरूण गरीबीला कंटाळून, तसेच नक्षल्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडून नक्षल चळवळीत सहभागी होतात. मात्र या चळवळीत गेल्यावर ही चळवळ कशी फसवी आहे, याची प्रचिती नंतर येते. परंतु बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याच्या नजरेस पडत नाही. अशातच पोलिसांनी राबविलेली आत्मसमर्पण योजना भुलथापांना बळी पडलेल्या नक्षल्यांना नवसंजिवनी देत आहे. या योजनेच्या आकर्षणामुळे अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणाच्या मार्गावर असल्याची कबुली आत्मसमर्पित नक्षल कमांडर रामाजी कोलु मज्जी याने दिली. विशेष म्हणजे गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या नवजीवन पंधरवाड्यानंतर गुरुवारी (दि.१०) आत्मसमर्पण केलेल्या ८ सहका-यांचे रामाजीने अभिनंदन केले आहे.
आदिवासींवर शासनाकडून अन्याय, तसेच पोलिसांकडून अत्याचार करण्यात येत असल्याचा अपप्रचार नक्षल्यांकडून करण्यात येत असल्याचे सांगून रामाजी म्हणाला की, गरीब व अशिक्षित असलेला आदिवासी तरूण नक्षल्यांच्या या खोट्या भुलथापांना बळी पडतो. नक्षल चळवळीत नकळतच सहभागी होतो. काही कळायच्या आतच आमच्या हाती बंदुका दिल्या जातात. बळजबरीने दाखल करून आणि पोलिसांची भीती दाखवून वरिष्ठ नक्षली या चळवळीच्या माध्यमातून केवळ आपले हित साध्य करीत आहेत, असे रामाजी म्हणाला. नक्षल चळवळीत सहभागी झालेला सामान्य आदिवासी तरूणांचा या चळवळीत भ्रमनिराश झाला आहे. संपुर्ण आयुष्य जंगलात जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो. चळवळीत एकदा गेल्यावर परतीचा कुठलाही मार्ग नसल्यामुळे चळवळीतील आदिवासी तरूण हतबल झाले होते. त्यातच वरिष्ठ नक्षल्यांकडून पोलिसांकडून मारल्या जाशील, अशी कायम भीती दाखविण्यात येते. नातेवाईक व घरच्या मंडळींची आठवण येऊनही, त्यांच्याशी भेटीगाठी होत नसल्यामुळे मानसीक खच्चीकरण होत असल्याचे रामाजी याने यावेळी सांगितले.
भामरागड दलमचा कमांडर असलेल्या रामाजीचे वय आज २५ वर्षे आहे. सन २००४ मध्ये सहाव्या वर्गात शिक्षण घेत असतांना नक्षलवाद्यांनी मला बळजबरीने जंगलात नेले. वयाच्या ११-१२ व्या वर्षीच त्यांनी माझ्या हातात बंदूक दिली. पोलिस आणि आपल्या विरोधात बोलणा-यांना ठार मारायचे, असे त्यांनी सांगितले. आपल्यालाही जीवाची भीती असल्यामुळे त्यांनी सांगितले काम मुकाट्याने केल्याशिवाय पर्याय राहात नाही. नक्षलवादी गावागावात जाऊन सरकार व पोलिसांकडून आदिवासींवर अन्याय, अत्याचार केले जातात, असा अपप्रचार वारंवार करीत असतात व बळजबरीने गावातील तरुण-तरुणींना चळवळीत सामील करून घेऊन एकप्रकारे नक्षलवादी सामान्य आदिवासी जनतेला मरणाच्या दारात उभे करीत आहे, असे तो म्हणाला.
नक्षल चळवळीत कुठेकुठे आणि कोणासोबत काम केले आहे, असे विचारले असता त्याने सांगितले की, भामरागड प्लाटूनचे सदस्य म्हणून त्याची प्रथम नियुक्ती झाली होती. यानंतर अनेक वर्षे केंद्रीय कमेटीचा सदस्य भुपती याचा अंगरक्षक म्हणून कार्य केले. पुढे कमांडर म्हणून पदोन्नती देण्यात आली. परंतु अनेक वर्षे या चळवळीत राहून या चळवळीत केवळ आदिवासींची दिशाभुल होत असल्याचे वेळोवेळी लक्षात येऊ लागले. पण बाहेर पडण्याचा मार्ग नसल्यामुळे मी हतबल आणि निराश झाला होतो. त्यातच परिवारापासून दूर असल्यामुळे कुटुंबाची सारखी आठवण येत होती. वडील आणि मोठा भाऊ यांचे निधन झाल्यामुळे चळवळीतून बाहेर पडण्यासाठी मी सन २०१२ पासून धडपडत होतो. अशातच पोलिस विभागाने आत्मसमर्पण योजना आणली. याची माहिती विविध पोस्टर्स व वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांमुळे आपल्याला कळाली. तसेच अनेक सहकारी आत्मसमर्पण करीत असल्यामुळे मनाचा ठाम निश्चय केला. तिथून जिवाची सुटका करून बाहेर पडलो आणि नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधून सन २०१५ या वर्षात आत्मसमर्पण केले.
सध्या पोलिस व शासनाकडून मोठ्या प्रमाणावर आपल्याला मदत मिळत आहे. रोजगारासाठी प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे आपले भविष्य सुखी झाल्याचे समाधान प्राप्त झाले आहे. लोकशाहीतच खरे आयुष्य असल्याची प्रचिती आली असल्याचे रामाजीने यावेळी सांगितले.