विद्यार्थिनी व महिलांसाठी अत्याधुनिक अभ्यासिकेची निर्मिती करणार : कृषिमंत्री दादाजी भुसे

0
16

मालेगावदिनांक 11 : मालेगावमधील प्रभाग क्रमांक 1 च्या मराठी शाळेचे रुपांतर विद्यार्थिनी  व महिलांसाठीच्या अभ्यासिकेमध्ये करण्यात येत आहे. या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थिनी  व महिलांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

मालेगाव येथील प्रभाग क्र. 1 मध्ये तयार करण्यात येणाऱ्या अभ्यासिकेच्या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी कृषिमंत्री श्री. भुसे बोलत होते. या कार्यक्रमाला मालेगाव महानगरपालिकेचे उपमहापौर निलेश आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनिल देवरे, सखाराम घोडके, संजय दुसाने, रामभाऊ मिस्तरी, मनोहर बच्छाव, नारायण  शिंदे, जय प्रकाश बच्छाव, प्रमोद शुल्का, राजेश गंगावणे, विनोद वाघ, प्रमोद पाटील, जितेंद्र देसले, सौ. कल्पना वाघ, पुष्पा गंगावणे, ताराबाई शिरससाठ, छायाताई शेवाळे, संगिता चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.

यावेळी कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की,  या अभ्यासिकेमध्ये थोर पुरुषांची पुस्तके व संगणक, इंटरनेट अशा सुविधा देखील उपलब्ध होणार असून महिला व मुलींना अभ्यासासाठी सुरक्षित वातावरण असणार आहे. तसेच या  मराठी शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने या अभ्यासिकेच्या माध्यमातून फुले दापत्याच्या जीवनपटाचे दर्शन शहरवासियांना होणार आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये टप्याटप्याने सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त गडावर जाणाऱ्या भविकांना माणुसकीच्या भावनेतून सहकार्य करावे, असेही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमापूर्वी महात्मा जोतिबा फुले यांच्या 195 व्या जयंती निमित्ताने आज राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.