मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वन्यजीव सप्ताह प्रदर्शनास भेट

0
22

मुंबई, दि.8 : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने ‘वन्यजीव सप्ताह २०२२’ निमित्त आयोजित  प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.

वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्यातील वन्यजीवांच्या छायाचित्रांचे तसेच प्रतिकृती (मॉडेल्स)चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी छायाचित्रे आणि त्यातील वन्यजीवांबाबत माहिती घेतली. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

वन विभागातर्फे ‘वन्यप्राण्यांचे संवर्धन हेच पर्यावरणाचे संरक्षण’ असा संदेश देणारे वन्यजीव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जंगलातील छोटे शिलेदार वाघांइतकेच महत्त्वाचे’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात छोटे पशू-पक्षी, सरपटणारे वन्यजीव तसेच निसर्गाची विविध रुपं उलगडून दाखवणाऱ्या छायाचित्रांचा तसेच सांबर, चितळ, भेकर, साळींदर अशा वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींचा समावेश आहे. त्रिमूर्ती प्रांगणात ताडोबामधील वाघाची कायमस्वरुपी प्रतिकृती आहे. प्रदर्शनातील वाघांसह इतर प्रतिकृतीही मंत्रालय भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.