तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यासाठी अपायकारकच- राजेश खवले

0
24

गोंदिया, दि. 08: तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक आहेत. ही बाब माहिती असतांना सुद्धा अशा पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. ही बाब आरोग्याच्या दृष्टीने घातक असून उत्तम सामाजिक आरोग्यासाठी नागरिकांनी व्यसनापासून दूर रहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.

             कोटपा कायदा 2003 अंतर्गत त्रेमासिक आढावा सभा अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हयामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामाला जाणून कोटपा कायदा 2003 बाबत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम गोंदिया जिल्हा सनियंत्रण व समन्वय समितीची त्रेमासिक आढावा सभा आयोजीत करण्यात आलेली होती. या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अमरिश मोहबे, डॉ. अनिल आटे जिल्हा मौखीक आरोग्य अधिकारी व जिल्हा सल्लागार समिती सदस्य, वैद्यकिय अधिकारी, दंत चिकीत्सक व समितीतील इतर सदस्य उपस्थित होते. सदर आढावा सभेमध्ये कोटपा कायदा 2003 विषयी सविस्तर माहीती देवून विविध सार्वजनिक ठिकाणी कोटपा कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

              कोटपा कायदा 2003 अंतर्गत कलम 4 नुसार सार्वजनीक क्षेत्रात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवनावर बंदी, कलम 5 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, कलम 6 (अ) नुसार अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय गुन्हा व कलम 6 (ब) नुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी तसेच कलम 7 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेस्टनवर धोक्याची सूचना देणे बंधन

कारक आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी जसे- दवाखाना, शाळा, महाविद्यालये, बस स्टाप, शासकिय-अशासकिय कार्यालये इत्यादी तसेच शाळा व दवाखाना यांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (खर्रा, गुटखा, पान मसाला इ.) सेवन करतांनी किंवा विक्री करतांनी आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.