वारकरी सेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
11

पुणे, दि.११: पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेला जिज्ञासा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. वारकऱ्यांची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असून सेवेचे हे कार्य अखंडितपणे सुरू ठेवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सर परशुराम महाविद्यालयातील सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी निधी पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ.श्रीराम सावरीकर, देवदत्त जोशी, प्रा.प्रगती ठाकूर, रोहन मुटके आदी उपस्थित होते.

श्री. कोश्यारी म्हणाले,  वारकरी बांधवाची सेवा हे मोठे कार्य आहे.  समर्पित भावनेने चांगले काम करताना अडचणीही येतात, मात्र अडचणीतून मार्ग काढून कार्य केले तर यश निश्चित मिळते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून २०१५ मध्ये १५ विद्यार्थ्यांच्या सहभागातून सुरू झालेल्या ‘जिज्ञासा’ या वारकरी सेवेच्या उपक्रमात आज ६५० विद्यार्थी  सहभागी झाले आहेत. सात वर्षातील या उप्रकमातील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग नोंद घेण्याजोगा आहे, असेही ते म्हणाले.

देशाला बलशाली बनविण्यासाठी सामाजिक उपक्रमात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. देशासाठी त्याग व  सेवा देण्यासाठी प्रत्येकाने पुढे  यायला हवे. देशासाठी योगदान देणारांचा कायम सन्मान केला जातो. उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत  जपलेला सेवाभाव अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

श्री.जोशी व श्री. सावरीकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

प्रास्ताविकात  रोहन मुटके यांनी जिज्ञासाच्या कामाबाबत तसेच आषाढी वारी उपक्रमाबाबत माहिती दिली.

यावेळी ‘जिज्ञासा’ उपक्रमात सहभागी  विद्यार्थ्यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते  गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य, विद्यार्थी  उपस्थित होते.