रत्नागिरीचे नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्विकारला पदभार

0
7

रत्नागिरी – रत्नागिरीचे नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पदभार स्विकारताच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देणार असल्याचे सांगून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शांतता समिती आणि अन्य समित्यांच्या सदस्यांसोबत संवाद साधणार आहे, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की, कोकण अतिशय निसर्गसुंदर आहे. त्यामुळे कोकणात येताना मी खूप उत्सुक होतो. इथले निसर्गसौंदर्य, प्रेमळ माणसं, कोकणातील लोकांची आदरातिथ्य करण्याची पध्दत हे सर्व मला माहित होते. त्यामुळे निश्चितच रत्नागिरीत येताना खूप आनंद वाटला. मी मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी काम केले आहे.त्यामुळे तो अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्याचा मला येथे काम करताना फायदाच होईल. यापूर्वीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली. त्यांनी सुरु केलेले उपक्रम आपण पुढे चालू ठेवू. त्याचबरोबर आणखी नवीन उपक्रम सुरु करु. तत्पूर्वी मी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देणार आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी, शांतता समिती आणि अन्य समित्यांच्या सदस्यांशी संवाद साधणार आहे. आणि त्यातून पुढे कामाला सुरुवात करु, असे त्यांनी सांगितले.