लेक अन् नवऱ्याला वाचवण्यासाठी सखुबाई वाघीण झाली

0
14

घरात घुसलेल्या बिबट्याला काठीनं बदडलं; ️कल्याणमध्ये मलंगगडावर थरार

कल्याण:-कुटुंबाला वाचवण्यासाठी ३० वर्षांची महिला बिबट्याला भिडली. आपल्या सहा वर्षांच्या मुलीसाठी ती भिंत म्हणून उभी राहिली. त्याचवेळी बिबट्यानं तिच्या पतीकडे मोर्चा वळवला. बिबट्यानं पतीवर हल्ला केला. तितक्यात पत्नी पतीसाठी धावून गेली. जवळच असलेली काठी घेऊन तिनं बिबट्यावर हल्ला चढवला. त्यामुळे बिबट्या पळून गेला. मात्र पतीच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. कल्याणमधील मलंगगडावर शुक्रवारी ही घटना घडली.

हाजीमलंग टेकडीवरील हाजीमलंगवाडीत वास्तव्यास असलेल्या घरात ३० वर्षांच्या सखुबाई पवारांचं कुटुंब वास्तव्यास आहे. सखुबाई त्यांचा पती पप्या (३४) आणि सहा वर्षांच्या लेकीसह इथे राहतात. त्यांच्या घराला दरवाजा नाही. रात्रीचं जेवण आटोपून त्रिकोणी कुटुंब झोपी गेलं. रात्री २ च्या सुमारास त्यांच्या घरात बिबट्या शिरल्या. तो सखुबाईंच्या मुलीवर हल्ला करणार होता. तितक्यात सखुबाई उठल्या. त्यांनी लेकीला आपल्या पाठिशी धरलं. बिबट्या आणि लेकीच्या मध्ये त्या भिंत बनून उभ्या ठाकल्या.

सखुबाईंचा पवित्रा पाहून बिबट्या त्यांच्या पतीच्या दिशेनं वळला. बिबट्या पप्या यांच्यावर चाल करून गेला. बिबट्यानं त्यांच्या चेहऱ्यावर हल्ला केला. पप्या जखमी झाले. तितक्यात सखुबाईंना जवळच असलेली एक काठी दिसली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता काठी उचलली आणि बिबट्यावर त्वेषानं हल्ला चढवला. त्यामुळे बिबट्यानं तिथून पळ काढला.

बिबट्यानं पळ काढल्यानंतर सखुबाई आणि त्यांच्या पतीनं मुलीसह जवळच असलेल्या सखुबाईंच्या भावाच्या घरात आश्रय घेतला. पप्या यांच्या चेहऱ्याला झालेल्या जखमा पाहता त्यांच्या तातडीनं उपचार होणं गरजेचं होतं. मात्र पवार कुटुंबाकडे खासगी वाहनानं रुग्णालया गाठण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे दिवस उजाडण्याची वाट पाहण्याखेरीज त्यांच्याकडे पर्याय नव्हता. सार्वजनिक वाहतूक सुरू झाल्यानंतर सकाळी पवार कुटुंबानं उल्हासनगरातील सेंट्रल रुग्णालय गाठलं.

पवार कुटुंबाच्या घरातील आणि घराबाहेरील ठसे पाहता हल्ला करणारा प्राणी तरस किंवा बिबट्या असावा, अशी शक्यता वन विभागाचे अधिकारी विवेक नातू यांनी व्यक्त केली. जखमी झालेल्या व्यक्तींचा जबाब घेतल्यानंतर याबद्दल स्पष्ट माहिती मिळू शकेल असं नातू म्हणाले. याआधी मलंगगडावर अनेकदा बिबट्याचे हल्ले झाले आहेत. बिबट्या अनेकदा जनावरांना लक्ष्य करतात. मात्र घरात घुसून माणसांना लक्ष्य केल्याची ही पहिलीच घटना आहे.