नांगरणीच्या प्रतीकाद्वारे विद्रोहीच्या मंडप उभारणीस प्रारंभ

0
12

भूमी सन्मान करीत दिला राजमाता जिजाऊंच्या कृतीला उजाळा
वर्धा,दि.28ः चार व पाच फेब्रुवारी रोजी वर्ध्यात होऊ घातलेल्या 17 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीची सुरुवात सर्कस ग्राउंड येथील नियोजित संमेलन स्थळावर रोठा ठाणेगांव येथील शेतकरी तुकाराम राऊत, मारुती तेलकट यांच्या हस्ते नांगरणी द्वारे भूमी सन्मान करीत व बळीराजा, जिजाऊ व सावित्री,भीमराय यांचा जयघोष करीत करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. नितेश कराळे, मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे, जेष्ठ समीक्षक डॉ. सुभाष खंडारे, महाराष्ट्र अनिसचे राज्यसचिव गजेंद्र सुरकार, प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई, ज्येष्ठ सत्यशोधक प्राचार्य जनार्दन देवतळे, निमंत्रक डाॅ. विश्वनाथ बेताल, समन्वयक राजेंद्र कळसाईत यांच्यासह विद्रोही संमेलन संयोजन समितीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
वर्धेतच त्याच तारखांना सरकारच्या दोन कोटी रुपयांच्या अनुदानाने होऊ घातलेल्या 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा पायाभरणी समारंभ वर्धेचे जिल्हाधिकारी, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते तसेच परिवर्तनवादी चळवळींंच्या मंचांवर वावरणाऱ्या व्यक्तींच्या उपस्थितीत पुरोहिताच्या हस्ते पौरोहित्य करीत मंत्रोच्चारात झाल्यामुळे सर्वत्र विशेषतः सोशल मिडीयावर गदारोळ झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रागतिक कृती करीत विद्रोही साहित्य संमेलनाने आज भूसन्मान कार्यक्रम घेतला. यावेळी बोलताना प्रा. नितेश कराळे म्हणाले की, एका दाण्याचे हजार दाणे करणारी भुमी हि अपवित्र असु शकत नाही, संपूर्ण भारत देशाची भूमी ही पावन व मंगल भुमी आहेच शिवाय वर्धेची भूमी ही गांंधी व विनोबांच्या वास्तव्याने पुनित झालेली आहे. अशा भूमीचा सन्मान आम्ही पुनर्निमीतीची क्षमता ज्या शेतकऱ्याकडे असते त्याच्या हस्ते नांगरणी करुन करीत आहोत. यावेळी बोलताना डाॅ. चोपडे म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी महाराष्ट्राची भूमी ही सोन्याच्या नांगराने नांगरून त्यात रयतेचे राज्य फुलवून स्वाभिमान व सन्मानाचे पीक आणले होते. आज आपल्या भूमीत पसरत असलेले प्रतिगामी विचारांंचे तण रोखण्याकरीता हि प्रतिकात्मक कृती होय. ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी त्या मागील धारणा आहे. यावेळी संदीप चिचाटे यांनी त्यांची “शासकीय संमेलनाची जय म्हणा लागण” ही कविता सादर केली. कार्यक्रमाचा आरंभ बळीराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला. तर सांगता संजय भगत यांच्या प्रबोधन गीताने झाली.
यावेळी कामगार आघाडीचे नंदकुमार वानखेडे, गुणवंत ढकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या अलका वानखेडे, ,कपिल थुटे, सुधिर गवळी, मीराताई इंगोले, डॉ.प्रफुल मून, डॉ. सुनिता भुईकर, मनिषा फुसाटे, डॉ. विद्या कळसाईत, श्रेया गोडे, मोहित सहारे,अशोक कांबळे, डॉ. संगिता बढे,अर्चना इंगोले, मिलिंद जुनगडे, डॉ मोहनिश सवाई, डॉ.दिपक मगरदे,अँड.विशाल चौधरी,अँड.अविनाश भगत, भालचंद्र दंभे, सुरेश हर्षवर्धन, मिलिंद फुसाटे हे मान्यवर उपस्थित होते.