अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात तात्काळ वाढ करा!: बाळासाहेब थोरात

0
13

मातंग समाजाच्या तरुणांच्या कल्याणासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा.

मुंबई,दि. ३ मार्च-अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशासेविका यांनी दुर्गम ग्रामीण भागात अत्यंत चांगले काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी आरोग्य सेवा सांभाळण्याचे काम केले. पण त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. सरकारने तात्काळ त्यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडताना थोरात म्हणाले की, राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस गावात, वाडी-वस्तीवर, दुर्गम भागातील तळागळात आरोग्याबाबत चांगले काम करीत आहेत. कोरोना सारख्या भयावह परिस्थितीतही त्यांनी आपला जीव धोक्यात घालून समाजाप्रती आपला समर्पण भाव दाखविला आहे. त्यांचे हे सामाजिक कार्य अत्यंत मोलाचे व कौतुकास्पद आहे.
सरकारकडे सातत्याने अनेक नोकरदारांचे प्रश्‍न येत असतात मात्र त्यातील अंगणवाडी सेविकांचा प्रश्‍न हा अत्यंत ज्वलंत व महत्वाचा आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस यांचे प्रश्न सुटावेत ही राज्यातील जनतेचीही सातत्याने मागणी आहे. सभागृहाचीही याबाबत सकारात्मक व अनुकुल अशी भूमिका आहे. सरकारने, मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांना गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांची अंगणवाडी सेविकांबाबतची भूमिका योग्य नसून सरकारने याबाबत तातडीने निर्णय जाहीर केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी. गंभीर स्वरुपाच्या प्रश्‍नांनबाबत उडवा उडवीची उत्तरे न देता ठोस निर्णय घ्यायला हवा.
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत मागील आठवड्यात पुरोगामी संघटनांचा कॉ. मिलींद रानडे यांच्या नेतृत्वात महामोर्चा झाला, सरकारकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. अडचणी आहेत त्या सोडवणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य व जबाबदारी आहे. गावात व दुर्गम भागात अंगणवाडी सेविकांचे चांगले काम व अत्यावश्यक सेवा असून त्यांच्या या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही ही शोकांतिका आहे. सरकारने तात्काळ अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतणीस यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे. मुख्यमंत्री व सरकारने संवेदनशीलतेची भूमिका घेवून तात्काळ योग्य निर्णय जाहीर केला पाहिजे.

मातंग समाजाच्या तरुणांच्या कल्याणासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा.

बाळासाहेब थोरात यांनी मातंग समाजासंदर्भातही लक्षवेधी उपस्थित केली होती, मातंग समाज हा मागासवर्गीय समाजातील अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या शौर्याची व देशभक्तीची परंपरा सांगणारा हा समाज आहे. या समाजातील घटकांच्या विकासासाठी सरकारने काही महत्वाचे ठोस निर्णय घ्यायला हवेत. अशी माझी व सर्व सभागृह सदस्यांची मागणी आहे. या नेत्यांची स्मारके व्हावीत, त्यांना आमचा विरोध नाही. मात्र त्या स्मारकांकडून प्रेरणा घेणे गरजेचे आहे.
मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सरकारने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मूलभूत शिक्षण हा प्रत्येक समाजातील बालकाचा महत्वाचा हक्क असून हे मूलभूत शिक्षण सर्व समाजातील घटकांना देणे सरकारचे प्रमुख कर्तव्य आहे. मातंग समाजाबाबतचा जो अहवाल सरकारने सादर केला आहे त्यात, या अहवालावर काय कार्यवाही झाली अथवा झाली नाही याबाबत निष्कर्ष हवेत. किती कालखंडात ही तपासणी सरकार करणार आहे व तपासणीनंतर काय कार्यवाही, कृती करणार आहे हे सांगणारा कालबद्ध कार्यक्रम असायला हवा. सरकारने या सर्व गोष्टींवर आपली प्रमुख भूमिका मांडणे महत्वाचे आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.