चला जाणूया नदीला अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
8

सोलापूर, दि. ३  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ नद्यांचा या अभियानात समावेश करण्यात आला होता. मात्र, या अभियानाची व्याप्ती वाढवून अनेक नद्यांचा समावेश करण्याच्या लोकाग्रह होत आहे. यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत असून, प्रत्येकाने या अभियानात योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.

सांगोला तालुक्यातील महुद येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि दीपक साळुंखे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) चारूशीला देशमुख-मोहिते, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, अभिनेता चिन्मय उदगीरकर, जलबिरादरीचे महाराष्ट्रचे अध्यक्ष नरेंद्र चुग, पर्यावरण अभ्यासक डॉ. अजित गोखले, सामाजिक तज्ज्ञ डॉ. सुमंत पांडे, नदी समन्वयक महेंद्र महाजन, बाळासाहेब ढाळे, सरपंच संजिवनी लुबाळ , उपसरपंच वर्षा महाजन यांच्यासह ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

मानव जन्म सर्वश्रेष्ठ मानला जातो. पण, मनुष्यप्राण्याने पंचमहाभूतांपैकी प्रत्येकाला प्रदूषित केले.  नदी ही पोषण, रक्षण करणारी, जीवनदायी असूनही तिचे शोषण करण्याचे काम झाले. मात्र, जल ही संपदा असून, भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नद्यांचे महत्त्व प्रत्येकाने लक्षाते घेणे गरजेचे आहे, असे सांगून मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, ईश्वराने दिलेली ही संपत्ती चिरंजीव असून, यावर मंथन होण्यासाठी चला जाणूया नदीला हे अभियान सुरू करण्यात आले. या अभियानास जन चळवळीचे, लोक सत्याग्रहाचे स्वरूप देण्यासाठी जात, धर्म, गरीब, श्रीमंत या भिंतीच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा, असे ते म्हणाले.

या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव खऱ्या अर्थाने साजरा झाला असल्याचे सांगून डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, जलसाक्षरता अभियान आणि जलयुक्त शिवार अभियानातून जलसंवर्धनाचे काम महाराष्ट्रात झाले. हे काम सर्व देशासाठी प्रेरणादायी असून केंद्राला त्याचे महत्त्व पटवून देऊन सर्व देशभरात अशा प्रकारचे अभियान राबवावे, यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारशी संवाद साधावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. २०१५ साली कासाळगंगा प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, त्यासाठी लोकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. हे जनतेच्या एकजुटीचे फळ आहे. हे अभियान लोकशाहीला मजबूत करणारे ठरेल, असे ते म्हणाले.

यावेळी आमदार शहाजी पाटील, अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील २३ गावे-वाड्यांची अर्थवाहिनी असलेला कासाळगंगा प्रकल्प प्रदूषणमुक्त अन बारमाही वाहण्यासाठी अभ्यास पूर्ण झाला. कासाळगंगा प्रकल्पाचा लोक अभ्यास आणि कृती अहवाल श्री. मुनगंटीवार यांना यावेळी सादर करण्यात आला. तसेच, हा अभ्यास करणारे पंढरपूर महाविद्यालयाचे चंद्रकांत खिलारे तसेच उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्रातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील भीमा, माणगंगा, कासाळगंगा, आदिला, धुबधुबी, कोरडा या नद्यांचा समावेश आहे. या उपक्रमात नदी संवाद यात्रा सर्वत्र झाल्या आहेत. दरम्यान कार्यक्रमाआधी बचतगट भगिनींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.