आरोग्य उपकेंद्रातील वृक्षांची कत्तल करून विक्री

0
61

दोषींवर कारवाईची मागणी, सेजगाव येथील प्रकार
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात असलेल्या वृक्षांची कत्तल करून त्या वृक्षांची विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे येथील एका आरोग्य सेविकेचे काही दिवसापूर्वीच पदोन्नतीवर स्थानांतरण झाले. व त्या कर्मचार्‍यानेच या वृक्षांची कत्तल करून विक्री केल्याची चर्चा गावात आहे. परिणामी या विषयाला घेवून ग्रामपंचायतीच्या सभेत चर्चा करून प्रकरणाची दखल घेण्यात आली. तसेच तक्रार करण्याचे निर्देश देण्यात आले. शासनाच्या वृक्ष लागवड योजनेला हरताळ फासण्याचे काम झाल्याने दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
सविस्तर असे की, सेजगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सद्या स्थितीत एक आरोग्य सेविका तसेच एक सीएचओ कार्यरत आहेत. तर काही दिवसापूर्वीच एका आरोग्य सेविकेचा पदोन्नतीपर स्थानांतरण झाले. पदोन्नतीपर स्थानांतर झालेल्या सेविका या मागील १५ ते १७ वर्षापासून याच उपकेंद्रात कार्यरत होत्या. दरम्यान त्यांनीच या झाडांची लागवड केली होती. मात्र स्थानांतरण झाल्यानंतर अचानक त्या झाडांची कत्तल करून विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आली. दरम्यान प्रकरणाची सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं.सदस्यांनी चौकशी केली तसेच स्थानांतरण झालेल्या आरोग्य सेविकेला विचारपूस केली असता, मी झाडांची लागवड केली होती, म्हणून मी कापून विक्री केली, अशी माहिती ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी दिली आहे. आज ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हा विषय चर्चेला आला. दरम्यान शासकीय जागेतील वृक्षांची कत्तल करता येत नाही, हे माहित असतांनाही एका शासकीय कर्मचार्‍याने हा प्रकार केल्याने त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात यावी, यासाठी तक्रार करणार असल्याचेही सांगितले आहे. शासन एकीकडे वृक्षा लागवडीसाठी विशेष मोहिम राबविते. तसेच वृक्षांचे संवर्धन करून त्याचे जतन करण्यासाठी निधीची तरदूत करून नागरिकांमध्ये जनजागृती करते. मात्र या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम झाल्याने घटनेची सत्यता तपासून दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

प्राथ. आरोग्य उपकेंद्रात आंबा, लिंबु व इतर प्रजातीचे झाडे होती. दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आपण कर्तव्यानंतर घरी गेलो. त्यानंतर सोमवारी आरोग्य उपकेंद्रात आल्यानंतर झाडांची कत्तल झाल्याचे दिसून आले. तसेच परिसरात वृक्षही दिसून आले नाही. या बाबतची रितसर तक्रार प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोरा येथील वैद्यकीय अधिकार्‍यांना करण्यात आली आहे.
– शेख मॅडम, सामुदायिक वैद्यकीय अधिकारी, प्राथ. आरोग्य उपकेंद्र, सेजगाव
…………..
आरोग्य उपकेंद्रातील प्रकरण काही दिवसापूर्वी उजेडात आले. या बाबतची पुर्ण माहिती घेण्यात आली आहे. तसेच आजच्या सभेत यावर चर्चाही करण्यात आली. वृक्षांची कत्तल करून त्याची विक्री करणार्‍या कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधितांना तक्रार करण्यात येईल.
– सौ. उषा कठाणे, ग्रा.पं.सरपंच, सेजगाव