पुणे दि. ७ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माजी विद्यार्थी संघाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित नामांकित माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अमृत महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील, माजी विद्यार्थी संघाचे संचालक राजेश पांडे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्ताने त्यांचा कर्तृत्वाचा परिचय होत आहे.
सिंबायोसिसचे डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी त्यांच्या गावी शिक्षणाचे रोपटे लावून शिक्षण क्षेत्रात चांगले कार्य केले आहे. कृत्रिम अवयव तयार करून लोकांच्या जीवनात संजीवनी निर्माण करण्यासाठी झटणारे डॉ. के. एच. संचेती आणि पुणे शहरात नृत्य प्रशिक्षणाच्या २५ संस्था स्थापन करणाऱ्या प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे यांचेही कार्य उल्लेखनीय आहे. इथेनॉल निर्मितीसाठी कार्य करणारे ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी आणि जेष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे या सर्वच सत्कारमूर्तीनी समाजात आपला ठसा उमटविला आहे, असे श्री.पाटील म्हणाले.
जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून पुणे विद्यापीठांतर्गत शास्त्रीय नृत्य संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे शिक्षणाचे, उद्योगांचे माहेरघर – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
केंद्रीय मंत्री श्री. प्रधान म्हणाले, पुणे हे देशातील शिक्षणाचे, उद्योगांचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. पुण्यात २५ पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात आपला प्रभाव कायम ठेवला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमात महाराष्ट्राने सक्रिय सहभाग घेवून चांगली कामगिरी बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार , ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. के. एच. संचेती, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे, ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी आणि जेष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाने विविध ठिकाणाहून गोळा केलेली माती एका कलशात संकलित करण्यात आली. माती संकलित केलेला अमृत कलश मान्यवरांच्या हस्ते मंत्री श्री. प्रधान यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.