पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशन, हर घर जल योजना आणि नळजोडणी कामांचा आढावा घेतला. पाणीपुरवठा योजना यशस्वी होण्याच्या दृष्टीने कामाच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता वैशाली आवटे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले, वीजेअभावी योजना बंद पडण्याची समस्या दूर करण्यासाठी सौर ऊर्जेवर योजना राबवावी. ‘हर घर जल’ योजनेचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे. पाणीपुरवठा योजनेची कामे चांगल्या दर्जाची होतील व योजना बंद पडणार नाही याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कालबद्ध नियोजन करून योजना लवकर पूर्ण कराव्यात. पाणी वितरणासाठी पाईप चांगल्या दर्जाचे वापरावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण यांनी जिल्हा परिषदेकडील योजनांची आणि श्रीमती आवटे यांनी मजीप्राकडील योजनांची माहिती दिली.