– वेळेत समन्यायी पाणीवाटप, वंचित तालुक्यांच्या ट्रिगर २ मध्ये समावेशाचाही ठराव
– आठवडाभरात राज्यस्तरीय बैठक होणार
सांगली, दि. 30 : संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थिती लक्षात घेता, कोयना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातील वीजनिर्मितीच्या ३५ टीएमसीपैकी १२ टीएमसी पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करावे, तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण कायद्यामधील तरतुदीनुसार नदीखोऱ्यातील समन्यायी पाणीवाटपाच्या तरतुदीनुसार सांगली व सोलापूर जिल्ह्याला वेळेत समन्यायी पाणीवाटप व्हावे तसेच वगळलेल्या तालुक्यांचा ट्रिगर २ मध्ये समावेश करण्यासाठी तोडगा काढावा, या ठरावांसह याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी राज्य स्तरावर उपमुख्यमंत्री तथा पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सांगली व सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आठवडाभरात बैठक घ्यावी, असा ठराव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आज येथे करण्यात आला. तसेच या बैठकीत शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक यंत्र सामग्री, ट्रान्सफॉर्मरसाठी महावितरण कंपनीस अतिरीक्त निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार सर्वश्री गोपीचंद पडळकर, अरूण लाड, अनिल बाबर, विश्वजीत कदम, विक्रमसिंह सावंत, शहाजी पाटील, समाधान आवताडे, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जलसिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, माजी आमदार प्रशांत परिचारक व दीपक साळुंखे पाटील, विशाल पाटील, शिवानंद पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.
टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांच्या रब्बी व उन्हाळी हंगाम सन २०२३ – २४ साठी सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी कालवा सल्लागार समितीची ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे वार्षिक पाणी नियोजन करण्यात आले. तसेच, मागील हंगामाच्या पीआयपी अनुपालनांचा आढावा आणि चालू हंगामातील पाण्याच्या नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली.
कोयना धरणाचा दि. १५ ऑक्टोबर रोजीचा पाणीसाठा लक्षात घेता, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठी पाणीवापराचे एकत्रित धोरण निश्चित करण्यात येते. यामध्ये तूट, आगामी वर्षातील टंचाईसदृष्य परिस्थिती लक्षात घेऊन पाणीवापराचे नियोजन करण्यात येत असल्याचे सी. एच. पाटोळे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी केलेल्या सादरीकरणात सांगली जिल्ह्यातील पर्जन्यमान, पाणीसाठे, टेंभू,
पाणीवापराचे नियोजन
सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गतवर्षी याच कालावधीत ८८ टक्के होता. सद्यस्थितीत कोयना धरणामध्ये ८९.०८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. टेंभू, ताकारी – म्हैसाळ योजना, नदीवरील सिंचन व बिगर सिंचन योजना याकरिता कोयना, वारणा धरण व इतर स्त्रोतातून एकूण उपलब्ध होणारे ४७.०५ टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे. याअंतर्गत टेंभू योजनेचा नियोजित पाणी वापर 11.55 टीएमसी आहे. यामध्ये कोयना धरण 8.91 टीएमसी तर इतर स्त्रोतापासून 2.64 टीएमसी (वांग 0.97 + तारळी 1.67 टीएमसी) तसेच ताकारी योजनेचा कोयना धरणातून 4.70 टीएमसी नियोजित पाणीवापर आहे. म्हैसाळ योजना 12.80 टीएमसी नियोजित पाणीवापर आहे. यामध्ये कोयना धरणातून 3.80 टीएमसी व वारणा धरणातून 8.58 टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे. कृष्णा नदीचा नियोजित पाणीवापर 18 टीएमसी असून, यामध्ये कोयना धरणातून 14.59 टीएमसी, वारणा धरणातून 3 टीएमसी व पुनर्भरण 0.41 टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे. यामध्ये कोयना धरणातून 32 टीएमसी, वारणा धरणातून 11.58 टीएमसी, इतर स्त्रोत 2.64 टीएमसी व पुनर्भरण 0.41 टीएमसी आहे.
त्याशिवाय, टेंभू योजनेतून 2 टीएमसी, ताकारी योजनेतून 0.90 टीएमसी, म्हैसाळ योजनेतून 3 टीएमसी, कृष्णा नदी 3 टीएमसी अशी एकूण 8.90 टीएमसी अतिरीक्त पाणी मागणी आहे. कोयना धरणाच्या वार्षिक पाणी वापरातील ११.७१ टीएमसी अपेक्षित तूट आहे.
ताकारी – म्हैसाळ – टेंभू उपसा सिंचन योजनांचे आगामी नियोजन
ताकारी योजनेंतर्गत रब्बी हंगामासाठी २ आणि उन्हाळी २ अशी चार आवर्तने देण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. सन २०२३-२४ अंतर्गत खरीप (टंचाई) साठी एक आवर्तन दि. २३ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत याआधीच देण्यात आले आहे. तर दि. १ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ आणि दि. १० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत रब्बीची दोन आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच, दि. १५ मार्च ते २५ एप्रिल २०२४ आणि दि. १५ मे ते १५ जून २०२४ या कालावधीत दोन उन्हाळी आवर्तने देण्याचे निश्चित करण्यात आले.
तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून सन २०२३ – २४ अंतर्गत दि. १८ जुलै ते २० ऑक्टोबर या कालावधीत खरीप हंगामाचे एक आवर्तन पूर्ण करण्यात आले असून, दि. १ नोव्हेंबर २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत रब्बी हंगाम आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दि. १ मार्च ते ३० जून २०२४ या कालावधीत एक उन्हाळी आवर्तन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
टेंभू उपसा सिंचन योजनेतून सन 2023-24 अंतर्गत रब्बीसाठी दि. 15 डिसेंबर 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत तर उन्हाळी आवर्तन दि. 1 एप्रिल ते 31 मे 2024 या कालावधीत देण्याचे नियोजन करण्यात आले. दरम्यान रब्बीसाठीचे आवर्तन लवकर सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली.
या बैठकीस जलसंपदा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता, अधिकारी, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.