मुंबईकरांनो २० मे रोजी कुठेही जाऊ नका, मनापासून मतदान करा

0
8

मुंबई, दि.२9: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांसह मुंबई शहरातील सहाही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी मुंबईकरांनी मुंबईतच थांबून मनापासून मतदान करावे, असे आवाहन प्रसिद्ध गायक शान ऊर्फ शंतनु मुखर्जी यांनी केले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या 177- वांद्रे पश्चिम मतदारसंघांतर्गत मतदार जागरूकता आणि सहभाग (स्वीप) कार्यक्रमांतर्गत आज सकाळी आर. व्ही. टेक्निकल स्कूल, रामकृष्ण मार्ग, खार जिमखाना येथून ‘व्होट टू व्होट रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भागवत गावंडे, प्राचार्या नेहा जगतयानी, स्वीपच्या नोडल अधिकारी मेधा कांबळे नायब तहसिलदार निखिल घाडगे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

गायक श्री. शान म्हणाले की, आपले मतदान लोकशाहीचा आत्मा आहे. प्रत्येकाने मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. 20 मे 2024 रोजी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले असल्यास ते एक दिवस पुढे ढकलावे. मी सुद्धा मतदानाच्या दिवशी मुंबईतच राहणार असल्याचे गायक श्री. शान यांनी सांगितले.

रॅलीत गायक श्री. शान यांच्यासह सहभागी नागरिकांनी ‘आपलं मत आपला अधिकार’, ‘बुढे हो या जवान- सभी करे मतदान’, ‘माय व्होट- माय फ्यूचर’, ‘आपका व्होट आपकी ताकत आपका मत आपका अधिकार’ आदी घोषणाही दिल्या. या रॅलीत नॅशनल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.