जागतिक हिवताप दिन- प्रभातफेरी व आशांचा प्रमाणपत्र देवुन गौरव

0
9

गोंदिया(दि.29 एप्रिल)- दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस हिवताप आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये “जागतिक हिवताप दिन”म्हणून साजरा केला जातो.हिवतापाच्या समूळ उच्चटणासाठी जागतिक पातळीवर अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात.
हिवतापाची कारणे,उपचार आणि प्रतिबंधात्मक उपांयाबद्दल संपूर्ण जगभर सामाजिक जागृती करणे आणि हिवतापाविरुद्ध चालविलेल्या मोहिमेचा आढावा घेणे, ही जागतिक हिवताप दिन साजरा करण्यासाठी उद्दिष्टे ठरवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण आजच्या दिनी माहिती दिली आहे.
सहसंचालक हिवताप व हत्तीरोग पुणे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
डासांच्या शरीरांतील मलेरियाच्या जंतूंच्या घडामोडीविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रमित होतो याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले आणि पुढील अभ्यासकांना दिशा दाखविली.दि. 25 एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य प्रशासन, जिल्हा हिवताप विभाग, केटीएस सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त प्रयत्ननाने जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वात प्रथम सर रोनॉल्ड रॉस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. के.टि.एस. सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात जागतिक हिवताप कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व सर रोनॉल्ड रॉस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल,जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे,जिल्हा मौखीक अधिकारी डॉ.अनिल आटे व ईतर मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
त्यानंतर हिवताप जनजागृती प्रभातफेरी केटीएस सामान्य सामान्य रुग्णालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे ,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवुन उदघाटन केले. प्रभातफेरी दरम्यान हिवताप आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.
डासांच्या आजारापासून असे राहा दूर
* आठवड्यातून एक दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळावा.
* घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा.
* पाण्याचे टँक तथा बैरेल स्वच्छ ठेवा, टँक उघडे ठेवू नका.
* सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात; खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
* झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका; त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा.
* घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे.
* घरासमोर झाडे लावल्यानंतर नागरिकांनी त्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नये. डासांच्या बहुतेक अळ्या त्याच ठिकाणी आढळतात. आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू आहेत, परंतु नागरिकांनी खबरदारी म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी उघडे ठेवू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी केले आहे.
डासांची वाढ रोखणेसाठी खालील सोप्या उपाययोजना कराव्यात –
1) घरातील सर्व पाणी साठवलेल्या पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत.
2) जे सिमेंटचे कंटेनर रिकामे करता येत नाहीत अशामध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस या
अळीनाशकांचा वापर करावा.
3) गावांमध्ये आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा.
4) वेंट पाइपला जाळ्या बसवावेत.
5) गावातील निरुपद्रवी निरुपयोगी असणाऱ्या टायरचे एकत्रित संकलन करून त्याचा नायनाट
केल्यास 25 टक्के रुग्ण संख्येत घट होऊ शकते.
6) गटारी वाहती करावीत.
7) घराच्या दारे खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
8) रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा .
9) दिवसा पूर्ण अंग झाकले जाईल असे कपड्यांमध्ये राहावे.
10) संध्याकाळी घरामध्ये धूर करावा.
जनतेसाठी आवाहन –

  • ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवावे.
  • कोणताही ताप अंगावर काढू नये.
  • या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहे तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.
  • घराच्या आजू बाजूला पाणी साठून देऊ नका.
  • कोणत्याही परिस्थीतीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण करू नका.

दुसर्या कार्यक्रमात जागतिक हिवताप दिन अनुषंगाने जिल्ह्यात किटकजन्य कार्यक्रम उत्तमपणे राबविल्याबद्दल आशा सेविका यांना त्यांच्या कार्याबद्दल प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.
कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी जिल्ह्यात गृहभेटीच्या माध्यमातुन आशा सेविका यांच्या माध्यमातुन विशेष सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आले. घरातील वापरण्यासाठी भरण्यात येणारे पाणी साठे तपासुन पाणीसाठ्यात डासाच्या अळ्या आढळून आल्यास ती भांडी रिकामी करणे ,रिकामे करता न येणाऱ्या पाणी साठ्यामध्ये टेमिफॉस किंवा बेटचे द्रावण टाकणे महत्वाचे असते.ताप सद्रुष लक्षणे असलेल्या लोकांचे आर.डी.के. किट द्वारे रक्त तपासणी करण्यात येत असते.हतीरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत लोकांना डिईसी व अल्बेंडेझॉल गोळ्या समक्ष खावु घालणे असे विविध कार्याबद्दल आशा सेविका यांना यावेळी गौरविण्यात आल्याची माहीती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी यावेळी दिली.

जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने जनजागृती प्रभातफेरी व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी विजय आखाडे,जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात,आरोग्य सहाय्यक किशोर भालेराव,आरोग्य पर्यवेक्षक श्री.डोंगरे, श्री. ठाकूर,श्री.भगत,श्री.जायभाय,श्री.दिपवादे,श्री.आशिश बले,श्री.पंकज गजभिये,वर्षा भावे यांचे सह आरोग्य विभागातील कर्मचारी व नर्सिंग कॉलेज चे विद्यार्थी व शहर विभागातील आशा कार्यकर्ती उपस्थित होते.कार्यक्रमात सुत्रसंचालन किशोर भालेराव व आभार प्रदर्शन नीरज अग्रवाल यांनी केले.