इंदापूरच्या तहसीलदारांवर वाळू माफियांचा हल्ला;लोखंडी रॉडने मारहाणतिघांना अटक

0
19
वाढदिवसाच्या शुभेच्छा

इंदापूर:-तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर शुक्रवारी दिवसा भरचौकात चार ते पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यातून तहसीलदार आणि त्यांचे चालक सुदैवाने बचावले. दरम्यान याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

तहसीलदार पाटील हे शहरातील जुन्या पुणे-सोलापूर मार्गावरून शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शासकीय वाहनातून आपल्या कार्यालयाकडे जात होते. त्यांची गाडी संविधान चौकात आली असताना पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची पूड टाकून, लोखंडी रॉड, गज याने हल्ला केला. त्यांनी गाडीच्या काचा लोखंडी गजाने पह्डल्या. सुदैवाने या हल्ल्यातून तहसीलदार पाटील व त्यांचे चालक मल्हारी मखरे बचावले. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची इंदापूर तालुक्याची ही दुसरी टर्म असून त्यांनी अवैध धंदे, विशेषतः वाळूमाफिया यांच्यावर चाप बसविला आहे. त्यातून त्यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गृहमंत्र्यांचा वचक नाही सुप्रिया सुळे
दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ‘इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे.हे सांगण्यास पुरेशी आहे.’तहसीलदारांवरील हल्ल्यामुळे इंदापूर येथे कायदा व सुव्यवस्था नसल्याचे दिसून येते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचे पुण्यातील कल्याणीनगर तसेच इंदापूर येथील घटनेवरून दिसून येत आहे. हल्लेखोर तसेच यामागचा सूत्रधार यांच्यावर कडक कारवाई करावी’ तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध.’ असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

गाडीखाली कुत्रं नाही, जिवंत माणसं चिरडली जातायतदेवेंद्र फडणवीस, राजीनामा द्या!रोहित पवार

पुण्यातील अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत सरकार आणि गृहखात्याचे वाभाडे काढले आहेत. गाडीखाली पुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील असे फडणवीस म्हणाले होते, आता तर गाडीखाली जिवंत माणसं चिरडली जातायत…फडणवीसांनी राजीनामा द्यावा असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलेय, गृहमंत्री महोदय…आता गाडीखाली पुत्रं नाही, जिवंत माणसं चिरडली जातायत. रस्त्याने चालणारा माणूस सुरक्षित नाही. इंदापूरच्या तहसीलदारावर भरदिवसा हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाहीत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालक मंत्र्यांचा पत्ता नाही. पुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता. आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

इंदापूरच्या तहसीलदारांवरील हल्ल्याची घटना निषेधार्थ; घटनेचा हर्षवर्धन पाटील यांच्याकडून निषेध

*हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूरच्या तहसीलदारांच्या गाडीवर आज धक्कादायक प्रकारे हल्ला करण्यात आला आहे. तसेच धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना निषेधार्थ आहे. अशी घटना इंदापूरमध्ये याआधी झाली नाही. यामध्ये आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई केली जावी, यासाठी पोलीस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.असले प्रकार कधी खपवून घेतले जाणार नाहीत. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. सरकारी अधिकारी आपल्या परीने काम करत असतात, मात्र अशा प्रकारे हल्ले होत असतील तर हे चुकीचं आहे, असेही ते हर्षवर्धन पाटील म्हणाले.

तहसीलदारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा;आमदार दत्तात्रय भरणे यांनीही केला निषेध

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या भ्याड हल्ल्याचा आता सार्वत्रिक निषेध होऊ लागला आहे.इंदापूरचे आमदार व माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या घटनेचा निषेध केला असून यासंदर्भात ताबडतोब हल्लेखोरांना शोधून कठोर कारवाई करण्यात यावी अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.या संदर्भात भरणे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला व प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचा हल्ला होण्याची इंदापुरातील ही पहिलीच वेळ आहे. त्यातच पाटील यांच्या विषयी इंदापुरातील सर्वसामान्य जनतेमध्ये समाधानाची भावना आहे. ते मिळून मिसळून सर्वांसमवेत काम करतात आणि सामोपचाराने मार्ग काढण्यावर त्यांचा भर असतो. अर्थात वाळूमाफियांना त्यांनी चांगलेच वठणीवर आणले होते. त्यामुळे वाळू माफियांचा त्यांच्यावर फार पूर्वीपासून रोष आहे.

दरम्यान झालेल्या हल्ल्यासंदर्भात दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेला हल्ला हा अतिशय धक्कादायक आहे. श्रीकांत पाटील हे अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी असून तालुक्यामध्ये त्यांच्या प्रशासकीय कामकाजाविषयी जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. असे असताना त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे अतिशय धक्कादायक आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हात टाकण्यापर्यंत कोणाची मजल जात असेल तर त्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्यावर तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काळा स्कॉर्पिओ मधून आलेल्या चार ते पाच जणांनी अचानक हल्ला केला. मिरची पूड घेऊन आलेल्या या हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. हा हल्ला नियोजित होता व त्याचे काही काळापूर्वी प्लॅनिंग केले असावे त्याशिवाय हे शक्यच नाही अशाही प्रतिक्रिया आता इंदापुरातून उमटू लागल्या आहेत.

कर्मचाऱ्यांनी मूक मोर्चा काढला

दरम्यान, तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. इंदापूर तहसील कार्यालयातील कामगारांनी काम बंद करत काळ्या फिती लावून तहसिल कार्यालयापासून पोलीस स्टेशनपर्यंत मूक मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला. हल्ला केलेल्या आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली. बारामतीमध्येही तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तहसीलदार यांच्यावरील हल्ला झाल्यानंतर नाकाबंदी करत पोलीस प्रशासनाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असून एका आरोपीला ताब्यात घेतल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.