बीड जिल्हा बँक घोटाळा: २० जण एसआयटीसमोर हजर

0
9

बीड,दि.29- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १४२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या विशेष तपास पथकाने कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली अाहे. या प्रकरणात माजी संचालक लाभधारक संस्थांच्या संचालकांसह १०१ जणांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या. अटकेच्या भीतीने अनेक संचालक अज्ञातवासात गेले असून मंगळवारपर्यंत २० जणांनी एसआयटीसमोर हजेरी लावली होती. दरम्यान, एसआयटीने जबाब नोंदवले आहेत. चौकशीसाठी आलेल्यांपैकी कुणाला अटक केली नाही.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात एकूण १३१ प्रकरणांमध्ये जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद अाहेत. या प्रकरणांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना दिले होते. त्यानंतर एसआयटीने रिक्स प्रो या खासगी कंपनीच्या मदतीने प्रकरणाचा तपास केला असून यात अनेक गुन्ह्यांमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम वाढवण्यात आले आहे. एसआयटीने जिल्हा बँकेच्या संचालकांसह १०१ जणांना सोमवारी नोटिसा बजावल्या आहेत. यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, विधान परिषदेचे आमदार अमरसिंह पंडित, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, माजी आमदार सुरेश धस, राजाभाऊ मुंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, रमेश आडसकर, बदामराव पंडित, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा, वडवणी नगर पंचायतीच्या भाजपच्या नगराध्यक्षा मंगल मुंडे यांच्यासह मातब्बरांची नावे आहेत.