सोनिया गांधी, मनमोहनसिंग उद्या नांदेडमध्ये

0
6

नांदेड,दि.13 : काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ़ शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच स्मृती संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खा़ सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान खा़ डॉ़ मनमोहनसिंग गुरुवारी नांदेड दौऱ्यावर येत आहेत़

या सोहळ्यासंदर्भात मंगळवारी पत्रपरिषदेत माहिती देताना माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण म्हणाले, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने साकारण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयाचे लोकार्पण तसेच डॉ़ चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोनिया गांधी यांच्या हस्ते होईल़ अध्यक्षस्थानी मनमोहनसिंग असतील.

माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी राज्यपाल डी़ वाय़पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ तसेच माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विकास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष वैशालीताई विलासराव देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, असे खा. चव्हाण म्हणाले.गुरुवारी सकाळी १० वाजता यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा होईल़ तत्पूर्वी पुतळ्याचे अनावरण व स्मृती संग्रहालयाचे लोकार्पण होईल़

या स्मृती संग्रहालयात डॉ़ शंकरराव चव्हाण यांची दुर्र्मीळ छायाचित्रे, साहित्यसंपदा तसेच महाराष्ट्राचा राजकीय इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला़ संग्रहालयाचे काम अजूनही सुरू असून त्यातील ठेवा अधिक समृद्ध करण्यासाठी सोसायटी प्रयत्नशील असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़