तूर डाळ भाव नियंत्रणात येणार – मंत्री गिरीष बापट

0
8

नागपूर,दि.13 : राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांनी तूर डाळीचा पेरा वाढवावा, उत्पादकता वाढवावी यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच बाजारपेठेत तूर डाळीच्या अनेक प्रतवारी असल्या तरी त्यांची किंमत 120 रुपयांपेक्षा जास्त जाऊ देणार नाही, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंगळवारला रविभवन येथे आयोजित बैठकीत दिले.

डाळीची साठवण क्षमता व त्याची मूल्य याची माहिती जनतेला व्हावी, चढ्या भावाने तूर डाळीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वचक बसावा यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज रविभवन येथे तूर डाळीची आयातदार, मिलर्स, घाऊक तसेच किरकोळ व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार अनिल सोले, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा पुरवठा अधिकारी एन. आर. वंजारी, पुरवठा उपायुक्त आर. एस. आडे, अन्न धान्य वितरण अधिकारी प्रशांत काळे, एल. जे. वार्डेकर तसेच वैध मापनशास्त्र, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे संबंधित अधिकारी, नागपूर विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी राज्याचे डाळीचे दर नियंत्रित ठेवण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

उपास्थितांशी संवाद साधताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट म्हणाले की, सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणात तूर डाळीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे नागरिकांना कमी भावात तूर डाळ बाजारपेठेत उपलब्ध व्हायला हवी. सण समारंभाच्या काळात तूर डाळीच्या मागणीत वाढ होते. हे बघताच तूर डाळ व्यापाऱ्यांनी शासनाला सहकार्य करुन डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

तूर डाळीचा पेरा वाढविण्यासंदर्भात बोलताना श्री. बापट पुढे म्हणाले की, मागणीच्या तुलनेत तूर डाळीचा पुरवठा कमी आहे. परदेशातून भारतामध्ये तूरडाळ आयात केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी तूर डाळीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घ्यावे, यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देईल. तसेच तूर डाळीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी प्रतवारीनुसार तूर डाळींच्या किमतीचे फलक दुकानामध्ये लावावे.

केंद्र सरकारने तूर डाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सकारात्मक पावले उचलली असून तूर डाळीचा बफर स्टॉक केला आहे. गरजेनुसार त्याचा वापर करण्यात येत आहे. केंद्र सरकारतर्फे साडे सातशे टन तूर डाळीचा पहिला टप्पा राज्याला मिळाला आहे. यानंतर राज्याला दोन हजार टन तूर डाळीचा दुसरा स्टॉक लवकरच मिळणार आहे. तसेच मध्यमवर्गीय गरिबांना तूर डाळ परवडावी यासाठी रेशन, अंत्योदय बीपीएल धारकाला दर महिन्याला एक किलो तूर डाळ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.