‘मनोरा’ इमारत धोकादायक – चंद्रकांत पाटील

0
15

कोल्हापूर – मुंबईतील “मनोरा‘ या आमदार निवासाची इमारत धोकादायक असल्याने ती पाडून नव्याने उभारली जाणार आहे. यासाठीची ग्लोबल निविदा प्रक्रिया काढली आहे. सुरवातीला चार पैकी एक इमारत पाडली जाणार आहे. पाडलेली इमारत पूर्ण झाल्यानंतर दुसरी इमारत पाडली जाणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. श्री. पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“मनोरा‘ इमारतीचे बांधकाम युतीच्या काळात पूर्ण झाले. याला आता वीस वर्षे पूर्ण झाली. विधिमंडळातील आमदारांची संख्या जसजशी वाढत गेली. तशी “आकाशवाणी‘ आणि मॅजेस्टिक हे दोन्ही आमदार निवास अपूरे पडू लागले. सध्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे संख्याबळ 288 इतके आहे. “मनोरा‘ आमदार निवासाची उभारणी झाल्यानंतर राज्यातील सर्व आमदारांच्या हक्काच्या निवासाची व्यवस्था झाली. एका इमारतीला सुमारे पंधरा मजले आहेत. अरबी समुद्राच्या काठावरच या इमारतींची उभारणी झाली आहे. अतिशय देखण्या आणि टोलेजंग अशा या इमारतीत अधिवेशन काळात मोठी वर्दळ असते. आमदारांच्या कार्यकर्त्यांसाठी याच निवासाचा आधार असतो. समुद्र किनारीच ही इमारत उभी राहिल्याने त्याच्या स्टॅबिलिट स्ट्रक्‍चर (मूळपाया) या संबधी शंका उपस्थित झाली. हा पाया डळमळीत होण्याची शक्‍यता आहे. याबाबत श्री. पाटील म्हणाले, “”मनोरा इमारतीचे बांधकामही कमकुवत झाले आहे. वीस वर्षांत इमारतीचे आयुष्य संपत असेल तर ते चुकीचे आहे. पण याबाबत चर्चा न करता या इमारती नव्याने उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासाठी डी.एस.के. ग्रुपशीही चर्चा झाली आहे. खासगी बांधकामासह शासकीय इमारतींचे बांधकामही आपण करावे असे आवाहनही डी.एस.के. यांना केले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.