सौदीत 10 हजार बेरोजगार भारतीयांची उपासमार

0
7

– –

नवी दिल्ली (पीटीआय)- नोकरी गेल्याने बेरोजगारी आलेल्या सुमारे दहा हजार भारतीय कामगारांची मागील तीन दिवसांपासून सौदी अरेबियातील जेद्दाह येथे उपासमार सुरू आहे. या कामगारांना मदत करण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे लवकरच सौदीला जाणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून दिली आहे.

बेरोजगार झालेल्या सुमारे 10 हजार भारतीय कामगारांची जेद्दाहमध्ये उपासमार सुरू असल्याचे सांगत याप्रकरणी स्वराज यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती एका व्यक्तीने ट्विट करून केली होती. ही बाब समोर आल्यानंतर परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत, असे स्वराज यांनी सांगितले. जेद्दाहमधील बेरोजगार कामगारांना अन्न पुरविण्याची व्यवस्था करण्याची सूचना आपण भारताच्या सौदी अरेबियातील दूतावासाला केली असल्याचेही स्वराज यांनी स्पष्ट केले. तसेच स्वराज यांनी सौदीत राहत असलेल्या भारतीय नागरिकांना उपासमार होत असलेल्या नागरिकांची मदत करण्याचे आवाहन केले आहे.

सौदी अरेबिया आणि कुवैत येथील भारतीय कामगार पगार आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. सौदीमध्ये या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर हे हा मुद्दा कुवैत आणि सौदीतील प्रशासनाकडे उपस्थित करणार आहेत, तर व्ही. के. सिंह हे लवकरच सौदीला जाणार आहेत, असे स्वराज यांनी सांगितले.

आखातात 60 लाख भारतीय
भारत सरकारच्या आकडेवारीनुसार बाहरीन, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या सहा आखाती देशांत सुमारे 60 लाख भारतीय कामगार काम करत असल्याचा अंदाज आहे. भारतातून आखातात बेकायदा प्रवेश करणाऱ्या कामगारांची संख्याही प्रचंड वेगाने वाढते आहे. आखातात काम मिळविण्यासाठी मध्यस्तांना मोठी रक्कम दिली जाते. अनेकदा भारतीय कामगारांना पगाराची खोटी आश्‍वासने दिली जातात.

कंपन्या बंद; पगार नाहीत
कुवैत आणि सौदीतील अनेक कंपन्या बंद झाल्यामुळे अनेक भारतीय कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकांना त्यांचे पगारही मिळालेले नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भारतीय कामगारांना सध्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते आहे. सौदीच्या तुलनेत कुवैतमधील परिस्थिती जरा बरी आहे, असे स्वराज यांनी सांगितले.

सौदी अरेबियातील बेरोजगार कामगारांना मोफत शिधावाटप करण्याची सूचना रियाध येथील भारतीय दूतावासाला केली आहे.
– सुषमा स्वराज, भारताच्या परराष्ट्रमंत्री