राज्यात “चिरंजीव’ योजना-आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत

0
8

मुंबई – राज्यातील ज्या भागात मातामृत्यू दर आणि अर्भक मृत्युदर जास्त आहे अशा भागात गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना हा पायलट प्रकल्प राबविला जाणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात डॉक्‍टरांच्या उपलब्धतेनुसार वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली. आमदार नीलम गोऱ्हे, हुस्नबानो खलिफे, माणिकराव ठाकरे, भाई गिरकर, तसेच इतर सदस्यांनी राज्यातील रुग्णालयाबाबत प्रस्ताव मांडला. त्या वेळी सावंत बोलत होते. राज्यातील रुग्णालयांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा पुरविण्यासाठी डॉक्‍टरांबरोबर विशेषज्ञ डॉक्‍टरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील असून, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांना फायदा होईल. त्याचबरोबर डॉक्‍टरांचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे वाढविण्याचे केंद्राकडे प्रस्तावित असल्याचेही सावंत यांनी सांगितले. तसेच रुग्णालयामधून बालकांची होणारी चोरी टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिले जात आहेत.