‘मंडल’ युगाचा आढावा घेणार्या राष्ट्रीय ओबीसी परीषदेचे पुण्यात 6 व 7 ऑगस्ट रोजी आयोजन

0
8

विशेष प्रतिनिधी
पुणे,दि.4- ‘मंडल’ आयोग अमलबजवणीला 25 वर्षे पूर्ण झाली असून संख्येने 52 टक्के असलेल्या सर्वधर्मीय ओबीसींना प्रत्यक्षात काय मिळाले व किती मिळाले, तसेच या निमित्ताने ओबीसींच्या झालेल्या जागृतीने देशाच्या राजकारणावर व समाजकारणावर केलेले निर्णायक परीणाम कोणते, याचा लेखा-जोखा विषद करणारी व पुढील लढ्याचा कार्यक्रम ठरविणारी राष्ट्रीय स्तरावरची वैचारिक परीषद पुणे येथे 6 व 7 ऑगस्ट 2016 रोजी आझम कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या परीषदेचे उद्घाटन 1992 साली मंडल आयोगाचा न्यायालीन निर्णय देणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधिश पी. बी. सावंत करतील. सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ पी. ए. ईमानदार स्वागताध्यक्ष आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ओबीसी चळवळीची वैचारिक मांडणी करून आंदोलन उभारणारे प्रा. श्रावण देवरे या परीषदेचे अध्यक्ष आहेत. प्रमुख उपस्थीती ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांची आहे’’, अशी माहीती सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या संयोजिका प्रतिमा परदेशी यांनी एका पत्रकाद्वारे दिलेली आहे.
परिषदेविषयी भुमिका मांडतांना पत्रकात पुढे म्हटले आहे की, ‘7 ऑगस्ट  1990 रोजी जनता दलाच्या तत्कालीन व्हि.पी. सिंग सरकारने अंशतः मंडल आयोगाची अमलबजावणी सुरू करताच देशभर दंगली उसळल्या. रामंदीर आंदोलन उभारून मंडल आयोगाच्या अमलबजावणीची वाट रोखण्यात आली. याच काळात ‘खाऊजा’ धोरण राबवून राखीव जागाच निकालात काढण्याचा प्रयत्न झाला. मंडल आयोगाचा अहवाल हा असा एकमेव अहवाल आहे की, ज्याच्या प्रामाणिक अमलबजावणीमुळे देशातील सर्वात मोठा जनविभाग असलेल्या सर्वधर्मीय 52 टक्के ओबीसी समाजाला न्याय मिळणार आहे. मंडल आयोगामुळेच देशातील जख्खड झालेली जातीव्यवस्था नष्ट होण्याचा मार्ग खुला होणार आहे. परंतू जातीव्यवस्था जिवंत ठेवू पाहणारी मनुवादी शक्ती देशाला पुन्हा एकदा अंधारयुगात ढकलायला निघालेली आहे. या मनुवादी शक्तीला परास्त करून देशाला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मंडल आयोगाच्या शिफारशींची पूर्ण अमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी देशपातळीवर मोठा लढा उभारण्याची गरज आहे. या लढ्याचे वैचारिक धोरण तयार करणे व कार्यक्रम आखणे यासाठी ही राष्ट्रीय स्तरावरची मंडलयुग परिषद आयोजित करण्यात आलेली आहे.’
  या परिषदेत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय व प्रशासकीय  अशा विविध विषयांवर एकूण 8 परीसंवाद व गटचर्चा होणार असून देशभरातील विचारवंत आपले विचार मांडतील. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते व ओबीसी युनायटेड फोरम चे प्रमुख दिलीप यादव व दिल्ली विद्यापीठाचे डॉ. प्रा. केदार मंडल, गुजराथ ओबीसी चळवळीचे प्रणेते जयंतीभाई मनानी, आंध्र प्रदेश ओबीसींचे नेते एम. ईश्वरैय्या या परीषदेला मार्गदर्शन करतील. ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदिप ढोबळे, मुंबई, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, कोल्हापूर, मुंबई विद्यापीठाच्या डॉ. वंदना महाजन, डॉ. लता प्रम, रेखा ठाकूर, पुणे विद्यापीठाचे प्रा. सतिश शिरसाठ, प्रा. टांकसाळ, ओबीसी चळवळीचे नेते नेताजी गुरव, बालाजी शिंदे, हासिब नदाफ, इकबाल अन्सारी, जैन ओबीसी चळवळीचे नेते डॉ. प्रदिप फलटणे, संध्या नरे-पवार, कॉ. किशोर ढमाले, सुहास पळशिकर, रेल्वे ओबीसी युनियनचे नेते टी.ए. लोहार, प्रा. नितीन बिरमल, डॉ. श्रीनिवास हेमाडे, प्रा. भगवानराव ढोबाळ, नुतन माळवी, डॉ. अजिज नदाफ, प्रतिमा परदेशी आदी विचारवंत व साहित्यिक ओबीसी-मंडल युगाचा आढावा घेतील व पुढील दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. या परीषदेला ओबीसी व जातीअंतवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक प्रा. प्रतिमा परदेशी,राहूल गोंगे, रोहीदास तोडकर,प्राचार्य संजय घोडेकर,रविंद्र झेंडे व किशोर ढमाले यांनी केले आहे.