धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये आरक्षण नाही – विष्णू सवरा

0
11

नागपूर-धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करता येणार नाही, असे राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले. त्यांच्या या विधानामुळे विधान परिषदेत मोठा गोंधळ उडाला. विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे विधान परिषदेचे कामकाज सलग तीन वेळा तहकूब करावे लागेल.
विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सवरा यांनी अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देता येणार नसल्याचे सांगितले. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
सत्ता मिळाल्यानंतर लगेचच धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. मात्र, याच सरकारमधील मंत्री एसटीमध्ये धनगर समाजाचा समावेश करता येणार नसल्याचे सांगत असल्यामुळे विरोधकांनी भाजपवर टीका केली. धनगर समाजाने निवडणुकीवेळी भाजपला डोक्यावर घेतले. आता त्याच पक्षाच्या सरकारने या समाजाला वाऱयावर सोडून दिले असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.