मुंबई-सरकारी कारभारातील लोकसहभाग वाढावा आणि जनतेच्या समस्या जाणून घेता याव्यात, या उद्देशाने राज्य सरकारतर्फे लवकरच ‘आपले सरकार’ हे मोबाईल अॅप्लिकेशन आणि पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याबरोबरच अधिक कार्यक्षम सरकारी कारभारासाठी लोकांचे अभिप्रायही मागविण्यात येणार आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान संचालनालयाकडून (डीआयटी) तयार करण्यात आलेल्या या अॅपसाठी राष्ट्रीय माहिती संस्था, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र ऑनलाईन या वेबसाईटची मदत घेण्यात येणार आहे. ही संपूर्ण यंत्रणा सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे ‘डीआयटी’कडून सांगण्यात आले.
तंत्रज्ञानाच्या साह्याने राज्याचा कारभार अधिक गतिमान कसा करता येईल, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सध्या ‘ई-गव्हर्नन्स’वर भर दिला जात आहे. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत येत्या २६ जानेवारी रोजी या अॅप्लिकेशनचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्त आणि जिल्हा तहसील कार्यालयाकडून राज्याच्या सचिवांकडे पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावांसाठी मंत्रालयात ‘ई-ऑफिस’ची यंत्रणा अंमलात आणण्याची सक्ती फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय, मुख्यमंत्री कार्यालयातील कागदोपत्री व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आली असून, संबंधित काम पूर्ण विशिष्ट कालमर्यादा निश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.