14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वीजबिलासाठी जुन्या नोटा स्वीकारणार

0
14

राज्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

मुंबई, दि. 12 : वीजबिलासाठी जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी राज्य शासनाने दि. 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार महावितरणकडून वैयक्तिक व घरगुती वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी जुन्या पाचशे व एक हजारांच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे.

सोमवार, दि. 14 नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक सुटी असली तरी महावितरणने राज्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहे. ही सर्व भरणा केंद्रे दि. 12 व 13 नोव्हेंबरला सकाळी 10 ते रात्री 7 पर्यंत तसेच दि. 14 नोव्हेंबरला सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. महावितरणच्या घरगुती व वैयक्तिक वीजग्राहकाचे वीजबिल जेवढ्या रकमेचे असेल तेवढ्या रकमेच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे. त्यासाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. तसेच वीजबिलापोटी आगाऊ स्वरुपात (ॲडव्हान्स पेमेंट) घेतले जाणार नाही.

वीजग्राहकांना त्वरित वीजबिल भरता यावे यासाठी आवश्यक पूर्वतयारीसह राज्यातील सर्वच केंद्रांवर महावितरणच्या नियमित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देण्यास सहकार्य करतील. हे अर्ज महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याशिवाय ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यासाठी महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.