गोविंद पानसरे हत्या प्रकरण : न्यायालयाने खडसावले तपास यंत्रणेला

0
12

कोल्हापूर, दि. 21 – कॉ. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी घेण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडेला हजर न केल्याने न्यायालयाने तपास यंत्रणेला खडसावले. ‘कॉ. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे कुठे आहे? त्याला हजर करायला सांगितले होते. जगात कुठेही ठेवा; पण माझ्या तारखेला तो हजर राहिला पाहिजे. कुठे आहेत तपास अधिकारी?’ अशा कडक शब्दांत शनिवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी तपास यंत्रणेच्या पोलिसांना खडसावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

पानसरे हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड व वीरेंद्र तावडे या दोघांची शनिवारी एकत्रित सुनावणी होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित गायकवाड याला न्यायालयात हजर केले. मागील सुनावणीत डॉ. तावडे याला हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; परंतु पोलिसांनी तावडेला हजर केले नाही. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होताच न्यायाधीश बिले यांनी ‘दोन नंबरचा आरोपी कुठे आहे?’ अशी विचारणा पोलिसांना केली.

तावडेला हजर का केले नाही याची माहिती नसल्याने सरकारी वकील शिवाजीराव राणे काहीवेळ गडबडून गेले. सहायक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी तावडे हा पुणे येथील येरवडा कारागृहात आहे. कारागृह प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे; परंतु त्यांनी उत्तर दिले नसल्याने आरोपीला हजर केले नसल्याचे सांगितले. त्यावर न्यायाधीश बिले यांनी ‘आरोपीला हजर करा म्हणून सांगितले होते. आरोपी तुमच्या कोठडीत आहे. त्याला कळंबा कारागृहात का ठेवले नाही? येरवडा कारागृहाचे कारण सांगणे कितपत योग्य आहे? तपास अधिकारी कुठे आहेत? आरोपीला जगात कुठेही ठेवा; पण माझ्या तारखेला तो हजर राहिला पाहिजे,’ अशा कडक शब्दांत खडसावत कानउघाडणी केली.