मोदींना आरक्षण संपवायचे आहे; मायावतींचा आरोप

0
6

लखनौ(वृत्तसंस्था),दि.21 – आरक्षण हा दलितांना घटनेने दिलेला हक्क आहे. तो हटविण्याचा कोणतेही सरकार, भाजप किंवा संघ करू शकत नाही. यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न भाजप किंवा काँग्रेसने केल्यास ते राजकारणातून नष्ट होतील. माझे जनतेला आवाहन आहे, की त्यांनी आगामी निवडणुकीत भाजप व संघाला धडा शिकवावा, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्या मायावती यांनी केली.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मायावती यांनी सत्ताधारी समाजवादी पक्षासह भाजप, काँग्रेस पक्षांवरही जोरदार टीका केली. जातीय आरक्षणाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे मत संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले होते. याच मुद्द्यावरून मायवती यांनी संघ आणि भाजपला फटकारले.

मायवती म्हणाल्या, की केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे जनता नाराज आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरली आहे. आगामी निवडणुकीत नागरिकांनी बसपला मतदान करावे. मुस्लिमांनी समाजवादी पक्षाला मतदान करू नये. भाजपचा पराभव करण्यासाठी बसपलाच मतदान करा. भाजपला बिहारमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. आता उत्तर प्रदेशमध्येही तेच होणार आहे.

मायावतींनी समाजवादी पक्ष आणि भाजपवर काय केले आरोप?
– मायावती म्‍हणाल्‍या, युपीतील समाजवादी पक्षाचे शासन हे सुरुवातीपासूनच भ्रष्‍ट, अराजकवादी आणि गुन्‍हेगारी प्रवृत्‍तीच्‍या लोकांनी भरलेले आहे. अखिलेश यांच्‍या कार्यकाळात उत्‍तर प्रदेशमध्‍ये 500 छोट्या-मोठ्या दंगली उसळल्या.
– केंद्रातील मोदी सरकारला आरक्षण व्‍यवस्‍था नष्‍ट करायची आहे. मोदींचा डाव यशस्वी झाला तर युपीतील जनता आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्‍ये भाजपला चांगला धडा शिकवेल.
-काँग्रेसने सुरुवातीला शीला दीक्षित यांना मुख्‍यमंत्रिपदाचे उमेदवार म्‍हणून घोषित केले होते. मात्र, सपासोबत अाघाडी करताच त्‍यांनी अखिलेशसारख्‍या कलंकित चेहऱ्याला पाठिंबा दिला आहे.
– बिहारममध्‍ये नितिश कुमार यांच्‍यामुळे काँग्रेस काठावर पास झाले. मात्र आता उत्‍तर प्रदेशच्‍या जनतेला काँग्रेस काय उत्‍तर देणार, हे तर स्‍पष्‍ट झाले आहे.
-अखिलेश यांनी भाजपच्‍या गुन्‍हेगारी नेत्‍यांचा आपल्‍या कार्यकाळात बचाव केला आहे. आता ते नेते निवडणुकीला उभे राहत आहेत. लोकांनी त्‍यांना त्‍यांची जागा दाखविली पाहिजे.
– या निवडणुकीत बसपला हरवण्‍यासाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत.’
– निवडणुकीपूर्वीच मुलायम सिंह यांना धक्‍का देत मायावतींनी मुलायम यांचे विश्‍वासू म्‍हणविले जाणारे अंबिका चौधरी यांना बसपत प्रवेश दिला आहे.