अहमदनगर, दि. २८ – कुस्तीतील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा किताब जळगावच्या विजय चौधरीने पटकावला आहे. रविवारी पुण्याच्या सचिन येलबरसोबत झालेल्या अंतिम सामन्यात विजयने बाजी मारत महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले आहे. महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा विजय हा ४१ वा कुस्तीपटू ठरला आहे.
महाराष्ट्र केसरी ही राज्यात मानाची सर्वोत्तम कुस्ती स्पर्धा म्हणून परिचित असून यंदा ही स्पर्धा अहमदनगरमधील वाडिया पार्क क्रीडा संकुलात रंगली होती. लाल मातीत रंगणारी ही कुस्ती स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी पर्वणीच असते. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यापूर्वी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणा-या एकाही खेळाडूने सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरी हा किताब नवीन खेळाडू पटकावेल असा अंदाज होता. रविवारी जळगावच्या विजय चौधरी आणि पुण्याच्या सचिन येलबर यांच्यात अंतिम सामना पार पडला. यामध्ये विजयने सचिन येलबरला धूळ चारत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. आत्तापर्यंत महाराष्ट्र केसरीमध्ये मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील कुस्तीपटूंचा वरचष्मा होता. पण जळगावमधील लहान गावातून आलेल्या विजयच्या या विजयामुळे महाराष्ट्रातील कुस्तीचे अच्छे दिन आल्याची भावना क्रीडा क्षेत्रात व्यक्त होत आहे.