मुंबई- काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा देणारा, काल आलेला पक्ष काँग्रेसला काय संपवणार. काँग्रेसला एक परंपरा असून शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून रहाणारा तो जगातील एकमेव पक्ष आहे. त्यामुळे ‘काँग्रेस मुक्त नाही तर काँग्रेस युक्त राष्ट्र’ या शिवाय पर्याय नाही. पराभवाने खचून न जाता काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेईल, असे मत माजी केद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या १३० व्या स्थापना दिनानिमित्त टिळक भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, नसिम खान, नितीन राऊत, कृपाशंकर सिंह, चंद्रकांत दायमा उपस्थित होते.
काँग्रेस नव्याने पुन्हा एकदा उभारी घेईल. त्यासाठी तरूणांनी काँग्रेसची धुरा सांभाळावी. पक्षात आलेली मरगळ झटकून नव्या दमाने कामाला लागावे. जे नेते सत्तरीच्या घरात आहेत त्यांनी निवृत्त होवून पक्षाच्या मार्गदर्शक आणि सल्लागाराच्या भूमिकेत राहावे, असेही ते यावेळी म्हणाले.
काँग्रेसने यापुर्वीही पराभव अनुभवले आहेत. पक्षाला पराभव हा काही नवीन नाही. त्यात खचून जाण्याची अजिबात गरज नाही. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालीही काँग्रेसला मोठा पराभव सहन करावा लागला होता. तेव्हा तर आता काँग्रेसला पुढील २५ वर्षे सत्ता मिळणार नाही असे चित्र उभे करण्यात आले होते. मात्र पुढच्या पाच वर्षातच जनतेने काँग्रेसकडे सत्ता सोपवली होती, याची आठवण शिंदे यांनी यावेळी करून दिली. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या एखाद्या पक्षाने काँग्रेस संपवण्याची भाषा करू नये. काँग्रेस सत्तेत लवकरच परतेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
त्यानंतर मुंबई काँग्रेसच्यावतीने तेजपाल सभागृहातही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नव्या दमाने पक्ष उभे करण्याचे काँग्रेस पुढे आव्हान असल्याचे यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे ,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, भाई जगताप उपस्थित होते.