नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाद्वारे राज्याचा सर्वांगीण विकास होईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
11

मुंबई दि.9: राज्य शासनाने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. अशा रस्ते बांधणीतून शहरे जोडली जाणे आणि दळणवळणाच्या साधनांचे जाळे निर्माण होत असल्याने राज्याचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे सादरीकरण विधानभवन येथे विविध वित्त संस्थांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या महामार्गाच्या बाजूला कृषी प्रकिया उद्योग, माहिती तंत्रज्ञान प्रकल्प, गृहबांधणी आणि इतरही पूरक उद्योगांची उभारणी केली जाणार आहे. त्यातून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात अपेक्षित आहे. हा महामार्ग अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असेल. हा महामार्ग दहा जिल्ह्यांतून जाणार असून चोवीस जिल्ह्यांना जोडणार आहे. राज्यातील विविध ओद्यौगिक क्षेत्रांशी हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे शेतीबरोबरच उद्योग क्षेत्रालाही त्याचा लाभ होणार असल्याचे यावेळी श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, हुडको, बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युको बॅंक, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक यासह अन्य बँका व वित्तसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.