ध्येय निश्चित असेल तर यशही निश्चित मिळते – डॉ. कादंबरी बलकवडे

0
13

नागपूर : जीवनात ध्येय निश्चित असेल तर प्रयत्न करायलाही धार येते आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर यशही मिळते. त्याकरिता सकारात्मक दृष्टीकोन व कठोर परीश्रमाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.विभागीय माहिती केंद्रात आज जागतिक माहिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कादंबरी बलकवडे विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या समुपदेशक ॲड. अंजली साळवे-विटणकर, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, आपल्याला काहीच जमत नाही, काही येत नाही. असा स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड असतो. पण असा विचार करण्यापेक्षा वेळेचा सदुपयोग करा. एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही. आणि पुढे जीवनात यशाची वाट सापडत नाही, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना सारखेच मार्गदर्शन केले जाते. फरक एवढाच की अभ्यास किती तास केला आणि काय केला याला महत्त्व आहे. कठोर परीश्रम केल्यानंतर फळाची अपेक्षा करू नका प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे यश निश्चितच मिळते.
महिलांना त्यांच्या कार्याची स्फूर्ती मिळावी, त्यांच्या कर्तृत्वाची सर्वांना ओळख व्हावी आणि स्त्री म्हणून जन्मली तरी व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार आहे याची जाणीव व्हावी. याकरिता जागतिक महिला दिन साजरा केला जातो. परंतु घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक समस्येचा सामना स्त्रिला करता आला पाहिजे. त्याकरिता कायदे करण्यात आले असून त्या कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. कायदे माहित असतील तर, ती खऱ्या अर्थाने सक्षम होईल, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या समुपदेशक डॉ. ॲड. अंजली साळवे-विटणकर यांनी सांगितले.
युनायटेड नॅशनच्या अधिनियमाप्रमाणे 1975 पासून जागतिक पातळीवर 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. समाजात महिलांना नेहमीच उपेक्षित ठेवल्या जाते. पण ती अबला नाही. व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रिला आहे. आपल्या मुलभूत अधिकाराविषयी माहिती देताना ॲड. अंजली साळवे- विटणकर म्हणाल्या की, समान संरक्षण कायदा, शिक्षणाचा अधिकार, मुक्तपणे विहार करण्याचा अधिकार, स्त्री – पुरूष समानतेचा अधिकार देण्यात आला आहे. ‍स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्या प्रमाणात त्या समाजाची प्रगती झाली आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या विचारांची आठवण यावेळी त्यांनी करून दिली.स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. ॲड. अंजली साळवे-विटणकर म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षा देण्याकरिता कठोर परीश्रमाची गरज आहे. परीक्षा देताना कितीही समस्या आल्या तरी डगमगून जावू नका, आत्मविश्वासाने परीक्षेचा सामना करा.संचालक राधाकृष्ण मुळी विद्यार्थ्यांना म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमुळे संघर्ष करण्याची चिकाटी तयारी होते आणि ध्येयही गाठून देते फक्त कधी हे निश्चित सांगता येत नाही पण प्रयत्न मात्र चालूच ठेवा.असे आवाहन केले. प्रारंभी प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.