बिलोली नगराध्यक्षाविरूद्धचे आमरण उपोषण लेखी आश्वासनामुळे स्थगित

0
18

नांदेड/बिलोली,दि.28-बिलोलीच्या नगराध्यक्षा मैथिली संतोष कुलकर्णी यांनी संगनमताने केलेल्या लाखो रूपयांच्या चौकशीअंती सिद्ध झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी जिल्हा प्रशासन काहीच कार्यवाही करीत नाही. म्हणून आधीच दिलेल्या नोटिसीप्रमाणे दि.27 मार्च रोजी बिलोली पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष यशवंत गादगे हे जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषणास बसले.त्यांच्या समर्थनार्थ माजी आ.गंगाधर पटने, माजी नगराध्यक्ष सुभाष पवार, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे ऍड. डी.जी. पवार, कार्यकर्ते सादिक पटेल हेही बसले होते.सध्या जिल्हाधिकारी तीन दिवसांच्या सुट्टीवर असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी यांनी यशवंत गादगे यांना चर्चेसाठी बोलावले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 1 एप्रिल रोजी आपल्यासोबत चर्चा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्णय घेऊ तोवर आपण उपोषण तुर्तास मागे घ्यावे, अशी विनंती केली.जिल्ह्याचे न.पा. प्रशासकीय अधिकारी व बिलोलीचे मु.अ.डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही चर्चेत भाग घेतला.लेखी आश्वासन दिल्यान तुर्त 1 एप्रिलपर्यंत आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय यशवंत गादगे यांनी घेत उपोषण सोडले. उपोषणास पाठिंबा देण्यासाठी नागपूरचे लोकशाही समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. रमेश जनबंदू, नांदेडचे कार्यकर्ते श्याम निलंगेकर, जोंधळे, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी आदी अनेकांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला.
दरम्यान, या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बिलोली तहसील कचेरीसमोर माजी नगराध्यक्ष यादराव तुडमे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष इंद्रजित तुडमे, भाजपाचे शहराध्यक्ष दिलीप उत्तरवार, प्रशांत अंकुशकर, शिवसेनेचे अभिजीत तुडमे, संजय चव्हाण व अन्य असंख्य कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले व घंटानाद केला.भ्रष्टाचार सिद्ध झाल्याने नगराध्यक्षाविरूद्ध गुन्हे नोंदवावेत, अशा मागणीचे निवेदन त्यांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना सादर केले.