ग्रामपंचायत डाटा आॅपरेटर उपोषणावर

0
17

मुंबई : राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांनी (डाटा आॅपरेटर) शुक्रवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. महाआॅनलाइन कंपनीचा करार रद्द करून शासन सेवेत कायम करण्याची त्यांची मागणी आहे.

महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सर्व संगणक परिचालकांना मानधन म्हणून ८ हजार रुपये देण्याचे परिपत्रक आहे. मात्र कंपनीतर्फे परिचालकांची तीन ते साडेतीन हजार रुपयांवर बोळवण केली जात आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करून शासनाने सर्व संगणक परिचालकांना १० हजार रुपये मासिक वेतन देऊन कायम सेवेत घेण्याची आंदोलकांची मागणी आहे.

याआधी १२ नोव्हेंबरपासून सर्वच ग्रामपंचायतींमधील परिचालकांनी कामबंद केल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्याची दखल घेत १८ नोव्हेंबर २०१४ रोजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी १० दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. परिचालकांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबर रोजी मोर्चा काढून मागणी पुढे केली. त्या वेळी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी १० दिवसांत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र ग्रामविकास मंत्र्यांकडे वेळ नसल्याचे कारण देऊन १२ व्या दिवशी त्यांनीही जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेने सांगितले.