पुण्यातील कचरा डेपोत टाकण्यास आणखी नऊ महिन्यांची मुदत

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील ग्रामस्थांनी डेपोत कचरा शास्त्रीय पद्धतीने टाकण्यास आणखी नऊ महिन्यांची मुदत देण्याचे मान्य केले. शिवाय डेपोविरोधी सुरू केलेले आंदोलनही ग्रामस्थ आणि संघर्ष समितीच्या सदस्यांनी मागे घेतले.

पुणे शहरातील फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील कचरा डेपोत टाकण्यास तेथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यामुळे पुण्यातील कचरा टाकायचा कोठे याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची विधानभवन पुणे येथे बैठक बोलावली होती. या बैठकीत ग्रामस्थांनी हा निर्णय जाहीर केला.

बैठकीला पालकमंत्री गिरीष बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सर्वश्री शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिरोळे, संजय काकडे, खासदार वंदना चव्हाण, आमदार सर्वश्रीमती माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, नीलम गोऱ्हे, आमदार सर्वश्री विजय काळे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर यांच्यासह फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी यापूर्वी एक वर्षाची मुदत मागण्यात आली होती. मात्र वर्षभर दोन निवडणुका असल्यामुळे विहीत वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास तांत्रिक अडचणी आल्या असतील तर त्या मार्गी लावण्यास राज्य शासन प्राधान्य देईल. ग्रामस्थांनी दिलेल्या मुदतीत कालबद्ध कार्यक्रम आखून त्यानुसार काम पूर्ण होते की नाही याची पाहणी करण्यासाठी शासन, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि पुणे महापालिकेचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली जाईल. ही समिती कचऱ्याच्या प्रश्नांवर पर्याय शोधण्यासाठीच्या कामावर लक्ष ठेवेल.

कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेच्या अर्थसकंल्पात प्राधान्य द्या, कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास पालकमंत्री गिरीष बापट यांची मदत घ्या अथवा थेट मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांना भेटा, अत्यंत तातडीचे काम असल्यास माझी भेट घेण्यासही हरकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना सांगितले.

श्री. बापट म्हणाले, पुणे शहरातील कचरा फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथे टाकण्यात येतो. कचऱ्यावर प्रक्रिया करणारा तेथील हंजर प्रकल्प बंद पडल्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. त्यामुळे तेथे दुर्गंधी आणि पाण्याचे स्त्रोत प्रदूषित झाले आहेत. तेथे कचरा टाकण्याच्या विरोधातील ग्रामस्थांची भूमिका योग्यच आहे. पण त्यावर पर्याय उभा करण्यासाठी काही कालावधी लागेल तो ग्रामस्थांनी द्यावा.

यावेळी श्री. शिवतारे, श्री. पवार, श्री. धनकवडे, श्री. शिरोळे, श्री. आढळराव-पाटील, श्रीमती गोऱ्हे, श्रीमती चव्हाण यांनी आपली मते मांडली.

बैठकीस विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजीव जाधव आदी उपस्थित होते.