वर्धा : गांधीजींचे विचार देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आजही मार्गदर्शक ठरणार आहे, असे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री म्हणून मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट दिली. तसेच सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या सामूहिक प्रार्थनेमध्ये सहभागी झाले. महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाचा लढा पूर्ण करुन भारत आगमणाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या महत्त्वपूर्ण क्षणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ सेवाग्राम आश्रमात आयोजित कार्यक्रमातही श्री. मुनगंटीवार सहभागी झाले होते.
प्रारंभी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत मटकर यांनी सुतमाळा व गांधीजीवरील पुस्तकांचा संच श्री. मुनगंटीवार यांना भेट दिला. तसेच जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी पालकमंत्र्यांचे वर्धा पर्यटन हे कॉफी टेबल बुक देवून जिल्ह्यातील पर्यटन तसेच सेवाग्राम विकास आराखड्याची माहिती दिली.
यावेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती चित्रा रणनवरे, उपाध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार विजय मुडे, सुरेश वाघमारे, विजय आगलावे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मा.म. गडकरी, बाबाराव खैरकर, नामदेव ढोले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री यांनी महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील प्रथम निवासस्थान, आदी निवास, बापूकुटी तसेच परिसराची पाहणी केली. या परिसराच्या विकासासाठी तसेच येथील व्यवस्थेबाबत सेवाग्राम प्रतिष्ठानतर्फे सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. सेवाग्राम आश्रमात संपूर्ण दिवस राहून येथील उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत माजी न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचीही भेट घेतली. तसेच ‘गांधी फॉर टुमारो’ या प्रकल्पाविषयीच्या सादरीकरणाद्वारे जिल्हा परिषदेच्या सेवाग्राम विकास आराखडा विषयी चर्चा केली.